लेबल नाही आणि स्वच्छतेची लेव्हलही नाही; मुलुंडच्या प्रसिद्ध ‘गुप्ता चणा भंडारा’ची मुंढेंनी काढली हवा!


लेबल नाही आणि स्वच्छतेची लेव्हलही नाही; मुलुंडच्या प्रसिद्ध ‘गुप्ता चणा भंडारा’ची मुंढेंनी काढली हवा!

मुंबईकरांची संध्याकाळ ज्या ‘सुकी पुरी’ आणि ‘मुरमुऱ्यां’शिवाय सुकी-सुकी जाते, त्याच जिव्हाळ्याच्या विषयाला अखेर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त मा. तुकारामजी मुंढे यांनी हात घातला आहे! मुलुंडमधील डम्पिंग रोडवर वसलेले प्रसिद्ध ‘गुप्ता चणा भंडार’ हे खरं तर नावाप्रमाणेच अनेक ‘गुप्त’ गोष्टींचा साठा करून बसले होते. पण मुंढे साहेबांच्या तिसऱ्या डोळ्यापुढे कसले आलेत गुप्त व्यवहार? त्यांनी थेट छापा टाकून या गुप्ताजींच्या चण्याची पार हवाच काढून घेतली आहे आणि व्यवसाय बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

अहो, आमच्या मुंबईत माणसाला जशी जन्माची तारीख नसते, तशीच या दुकानातील शेव, चणा आणि मुरमुऱ्यांच्या पाकिटांनाही अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार आवश्यक असलेली ‘निर्मितीची तारीख’ नव्हती! ‘Expiry Date’ चा तर पत्ताच नव्हता. कदाचित गुप्ताजींचा असा ठाम विश्वास असावा की, त्यांच्याकडचा चणा हा काळ-वेळाच्या पलीकडचा, म्हणजेच ‘अजरामर’ आहे. पण जेव्हा अन्न सुरक्षा अधिकारी छत्रपालसिंह राजपूत आणि ऋषिकेश दर्शनवाड यांचे पथक तिथं पोहोचलं, तेव्हा तिथला अवतार पाहून त्यांचे डोळेच पांढरे झाले. तिथली गंभीर अस्वच्छता आणि किटकांचा सुळसुळाट पाहून, ‘हा चणा नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांसाठी आहे की केवळ जंतूंच्या संगोपनासाठी?’ असा रास्त प्रश्न कोणालाही पडावा.

कायद्यानुसार ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या दुकानावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट कायदेशीर बडगा उगारला असून, तब्बल ११४.२ किलो वजनाचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या सुकी पुरी, बारीक शेव, भाजलेला चणा, मुरमुरे आणि हिरवे वाटाणे यांची किंमत अवघी ८ हजार २९० रुपये असली, तरी नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या संभाव्य शारीरिक त्रासाच्या तुलनेत ही किंमत काहीच नाही. सर्व साठा कायदेशीररित्या जप्त करून त्याचे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आता प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांना या चण्यातून नियमांचे आणखी कोणते उल्लंघन आढळते, याचीच उत्सुकता आहे.

प्रशासनाने गुप्ताजींना कायद्याचा स्पष्ट कडक इशारा दिला आहे की, जोपर्यंत दुकानातल्या त्रुटी पूर्ण होत नाहीत, परिसर पूर्णपणे निर्जंतुक आणि स्वच्छ केला जात नाही, तोपर्यंत चणा भाजणे तात्काळ बंद ठेवा! गुप्ताजी, चणा खाऊन माणसाने ‘घोडा’ व्हावा अशी अपेक्षा असते, पण तुमच्या चण्याने माणूस थेट आजारी पडेल अशी चिन्हे होती. बरं झालं मुंढे साहेबांनी कायद्याची लगाम वेळीच आवळली! आता आधी कायदेशीर नियमांचे आणि स्वच्छतेचे पालन करा, मगच पुढचे चणे फुटाणे!


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!