सोनाळीत लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या राणी तापकर हिचा छळ ; तापकर कुटुंबावर मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल!”
*मुरगूड :* संसार म्हटला की कुरबुरी आल्याच, पण या कुरबुरींना जेव्हा छळाचे हिडीस रूप येते, तेव्हा कायद्याला मध्यस्थी करावीच लागते. कागल तालुक्यातील सोनाळी येथील एका घरातून दुर्दैवाने अशीच एक विदारक कहाणी समोर आली आहे. आपल्या हक्काच्या घरात, हक्काच्या माणसांकडूनच कौटुंबिक सुखाला पारख्या झालेल्या एका विवाहितेने अखेर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून, तिच्या तक्रारीवरून मुरगूड पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाच्या बेडीत अडकताना या पोरीने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली असतील, पण तिच्या नशिबी मात्र मानसिक आणि शारीरिक त्रासाचेच भोग आले! पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, मूळची बेळगाव (कर्नाटक) जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आणगोळ येथील असलेली आणि सध्या सोनाळी (कात्रे गल्ली) येथे सासर असलेल्या **राणी सचिन तापकर** या २९ वर्षीय विवाहितेने पती सचिन शिवाजी तापकर, सासू कमल शिवाजी तापकर आणि सासरे शिवाजी तापकर यांच्याविरुद्ध कायद्याचे दार ठोठावले आहे.
लग्न झाल्यापासूनच किरकोळ कौटुंबिक कारणांवरून वाद उकरून काढणे, त्यातून या माऊलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे, आणि घरातून हाकलून देण्याची भाषा करणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप तिने केला आहे. घरात लक्ष्मी म्हणून आलेल्या सुनेला जर कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल, तर आपल्या समाजमनाची विदारकता यापेक्षा दुसरी काय असू शकते?
तक्रारीतील माहितीनुसार, गतवर्षीच्या १६ डिसेंबर २०२५ रोजी घरात वादाची ठिणगी पडली. या वादाचे पर्यवसान मारहाण आणि अपशब्दांच्या वर्षावात झाले. ज्या हातांनी सुनेला मायेने सांभाळायचे, त्याच हातांनी तिला छळले, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या संवेदनशील प्रकरणाची मुरगूड पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. संबंधित तापकर कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कायद्याच्या चौकटीत राहून प्रकरणाचा सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भिकाजी पारके करत आहेत. सध्या सोनाळी परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, एका सुखी कुटुंबाचे हे असे कायद्याच्या कचाट्यात जाणे परिसरातील नागरिकांना चटका लावून जात आहे.

























