शिरढोणकरांचा महावितरणला ‘जोरात ‘ करंट; ‘स्मार्ट’ होण्याच्या नादात साहेबांचेच ‘फ्यूज’ उडाले..!

शिरढोण : जनतेचा कौल न घेता, वरून लादल्या गेलेल्या धोरणांना शिरढोणकरांनी सोमवारी असा काही जळजळीत ‘करंट’ दिला, की महावितरणच्या ‘स्मार्ट’ कारभाराचे गावात पुरते ‘फ्यूज’ उडाले!

कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि गावकऱ्यांना विश्वासात न घेता गावात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा धडाका महावितरणने सुरू केला. लोकशाहीत ग्राहकांच्या अधिकाराला केराची टोपली दाखवून, गुपचूप कारभार उरकण्याच्या महावितरणच्या या पद्धतीमुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. “आमची संमती न घेता हा निर्णय आमच्या माथी मारणारे तुम्ही कोण?” असा रोखठोक सवाल करत संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले.
आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, अविनाश पाटील, शोभा पाणदारे आणि विजय मगदूम यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचा महामोर्चा थेट वीज मंडळाच्या दारात धडकला. सुमारे सहा तास चाललेल्या या आंदोलनात संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
“ग्राहकांना अंधारात ठेवून अशा प्रकारे मीटर बदलणे हा थेट नियमांचा भंग आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार यंत्रणेवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि हे नवीन मीटर तातडीने हटवून पूर्वीची हक्काची मीटर व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी,” अशी ठाम आणि कायदेशीर मागणी यावेळी गावकऱ्यांनी लावून धरली. आंदोलकांनी विचारलेले प्रश्न सरकारी धोरणावर नेमके बोट ठेवणारे होते—
“अहो साहेब, प्रीपेड वीजप्रणाली म्हणजे काय? गरिबांनी आधी रिचार्ज करायचा आणि मगच घरात दिवा लावायचा? वीज हे मूलभूत साधन आहे की कोणत्या खाजगी कंपनीचे खेळणे?”
या तांत्रिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर उत्तर देताना महावितरणच्या प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. वादाचा ‘व्होल्टेज’ वाढून परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
यंत्रणा डिजिटल करण्याच्या नादात सामान्य माणसाच्या खिशाचा विचार करायला प्रशासन विसरले आहे. तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी असावे, त्याच्या डोकेदुखीसाठी नाही! मीटरला ‘स्मार्ट’ म्हणता, पण त्याआधी प्रशासकीय कारभारात ‘स्मार्टनेस’ आणि पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, याचे भान महावितरणने ठेवावे. तूर्तास, शिरढोणकरांनी लोकशाही मार्गाने महावितरणला चांगलाच धडा शिकवला आहे, एवढे मात्र नक्की!


























