बजेटची झाली माती, कबरींचीही वाहतेय माती; पुणे मनपाच्या ढिसाळ कारभाराचा ‘रिपाई’कडून जाहीर निषेध.!

पुणे —”महानगरपालिकेचे अधिकारी जिवंत माणसांच्या तक्रारींना दाद देत नाहीत, हे तर उघडच आहे; पण आता त्यांनी चक्क मरून शांत झोपलेल्यांनाही ‘पाण्यात’पाहण्यास सुरुवात केली आहे..!”

बोपोडी येथील मुस्लिम कब्रस्तानच्या (दफनभूमी) दुरवस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (**सचिन खरात गट**) या पक्षाने नुकतंच पुणे मनपा आयुक्तांना एक तिखट, पण तितकंच मार्मिक निवेदन दिलं आहे. पक्षाचे प्रदेश मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन महापालिकेच्या ‘कासवगती’ कारभाराचा जाहीर निषेध केला.

गोष्ट मोठी गमतीशीर आणि तितकीच गंभीर आहे. गेल्या वर्षी २५ मे २०२५ रोजी मुल्ला सरांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात जाऊन साहाय्यक आयुक्तांची भेट घेतली होती. तेव्हा त्या साहेबांनी “बजेटची तरतूद करतो आणि पुढची कारवाई करून घेतो,” असं आश्वासन अगदी गोड शब्दात दिलं होतं. पण महापालिकेचं बजेट म्हणजे काय स्वर्गातून उतरणारी गंगा नव्हे! आज तागायत तिथे एक पैशाचीही वाढीव सुविधा पोहोचलेली नाही.
परिणामी, परिस्थिती ‘जैसे थे’ नव्हे, तर ‘वैसे थे’ झाली आहे. आता पाऊस सुरू झाला आहे. पुण्यात पाऊस पडला की धरणातून पाणी सोडणार आणि धरणातून पाणी सोडलं की बोपोडीच्या कब्रस्तानमध्ये थेट ८ ते १० फूट पाणी शिरणार! सध्याची अवस्था अशी आहे की, या पुराच्या पाण्यामुळे आधीच दफन झालेल्या कबरींवरची माती वाहून जात आहे आणि कबरी उघड्या पडत आहेत. म्हणजे, जिवंतपणी पालिकेच्या पाणीपट्टी आणि कर रचनेच्या जाचातून सुटून माणूस एकदाचा शांत निजला, तरी तिथेही त्याला पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे उघडं पडावं लागत आहे!
मुल्ला सरांनी निवेदनात अत्यंत मार्मिक प्रश्न उपस्थित केला आहे की, पाऊस सुरू असताना जर एखाद्या मुस्लिम बांधवाचा मृत्यू झाला, तर अंत्यसंस्कार (दफन) करण्यासाठी नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पाणी साचल्यामुळे खड्डे पडत आहेत. म्हणजेच, पुण्यात आता माणसाने मरतानासुद्धा “पावसाळा संपू द्या, पालिकेची संरक्षण भिंत उभी राहू द्या आणि नदीतला राडारोडा निघू द्या, मगच मरू,” असा विचार करून मरायचं की काय? कब्रस्तानच्या नळाला पाणीही कमी येतंय. तिकडे जिवंत पुणेकरांना पाणी कपात सोसावी लागते, तिथे मृत्यूनंतरही पाण्याची टंचाई! महापालिकेची ही समसमान न्यायबुद्धी खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल!
या शिष्टमंडळात मुल्ला सरांसोबत सामाजिक कार्यकर्ते विजूभाऊ कांबळे आणि छत्रपती शिवाजी महाराज मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे की, “आता धरणातून पाणी सुटायच्या आत कब्रस्तानसाठी संरक्षण भिंत बांधा आणि पावसामुळे खचलेल्या कबरींसाठी किमान तीन-चार ट्रक माती तरी द्या. जर वारंवार निवेदनं देऊनही समस्या सुटणार नसतील, तर आम्हाला लोकशाही मार्गाने ‘जनआंदोलन’ करावं लागेल.”
आता प्रश्न एवढाच उरतो की, नेहमी कुंभकर्णी झोपेत असणारं पुणे मनपा प्रशासन या जिवंत माणसांच्या इशाऱ्याने जागं होतं की कब्रस्तानमधली शांतता भंग पावण्याची वाट पाहतं, हे येणारा काळच ठरवेल!


























