प्रशासनाचा ‘बांडगुळ’ कारभार खपवून घेणार नाही; इचलकरंजीत काँग्रेसची डरकाळी!


प्रशासनाचा ‘बांडगुळ’ कारभार खपवून घेणार नाही; इचलकरंजीत काँग्रेसची डरकाळी!

इचलकरंजी | गजानन शिरगावे :

सत्ताधाऱ्यांच्या मस्तवालपणाला आणि प्रशासनाच्या थंड पडलेल्या कारभाराला आज इचलकरंजीत काँग्रेसने जळजळीत ‘अंजन’ घातले! शशांक बावचकर यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसच्या शिलेदारांनी प्रांत कार्यालयावर असा काही ‘हल्लाबोल’ केला की, खुद्द साहेबांच्या खुर्च्याही हलू लागल्या. “जनतेच्या प्रश्नांवर जर अधिकारी ढिम्म राहणार असतील, तर त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा रणझुंजार इशाराच आज या आंदोलनातून देण्यात आला.

रणमैदानातील झुंजार शिलेदार…!

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे धिंडवडे काढण्यासाठी शशांक बावचकर यांच्यासोबत संजय कांबळे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे आणि बाबासाहेब कोतवाल यांसारखी आक्रमक मंडळी मैदानात उतरली होती. प्रशांत भिवरे, हारून खलिफा, गजानन शिरगांवे आणि रवि वासुदेव यांनी आपल्या बुलंद आवाजाने प्रशासकीय इमारतीचा परिसर दणाणून सोडला. ही केवळ गर्दी नव्हती, तर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध पेटलेला एक ‘वणवा’ होता!

रणरागिणींचा एल्गार..!

केवळ पुरुषच नव्हे, तर काँग्रेसच्या रणरागिणींनीही आज आपला बाणा दाखवला. निर्मला शिरगांवे, विद्या भोपळे, सावित्री हजारे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा निषेध केला. “ज्या हातांनी आम्ही चूल पेटवतो, त्याच हातांनी अन्यायाची राख करायलाही आम्हाला वेळ लागणार नाही,” अशा संतप्त भावना या माऊलींच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होत्या.

नायब तहसीलदारांना ‘खडे बोल’ !

मोर्चा प्रांत कार्यालयावर थडकताच नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदनाचे ‘अस्त्र’ देण्यात आले. मात्र, हे केवळ कागदावरचे शब्द नसून, त्यामागे हजारो सर्वसामान्यांचा तळतळाट आणि संताप दडलेला आहे, हे बावचकर यांनी आपल्या तडाखेबंद भाषणातून ठणकावून सांगितले.

आता या निवेदनानंतर प्रशासनाचे ‘डोळे’ उघडणार की ते नेहमीप्रमाणे ‘कुंभकर्णी’ झोप घेणार, हे पाहावे लागेल. पण प्रेस मीडिया लाईव्हच्या माध्यमातून जनतेचा हा आवाज आता मंत्रालयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!