वायसीएमच्या शवविच्छेदन विभागात कथित दारू पार्टी! बाटल्या, पेग, चकना अन् जेवणाची ताटं; व्हिडीओमुळे खळबळ.


दारु पार्टी करणाऱ्यांना बंडतर्फ करा :- सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर याचे निवेदनाद्वारे मागणी.

मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर प्रतीक्षा; व्हिडीओतील व्यक्तींची ओळख आणि आरोपांची चौकशी करण्याची मागणी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

पिंपरी दि. :- पिंपरी चिंचवड मध्ये रुग्णाला घेऊन जाताना वाहनचालकाच्या हलगर्जीपणा मुळे रुग्ण रुग्णवाहिकेतून खाली पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात कथित दारू पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, वैद्यकीय व्यवस्थेतील शिस्त आणि जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

शवविच्छेदन विभागातील टेबलवर दारूची बाटली, भरलेले पेग, चकना आणि जेवणाची ताटे दिसत असल्याचा दावा व्हिडीओच्या आधारे केला जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणाऱ्या अतिसंवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे मद्यपानाची पार्टी झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. मात्र, या व्हिडीओची सत्यता आणि घटनेमागील नेमकी परिस्थिती अधिकृतरीत्या स्पष्ट होणे आवश्यक आहे.

मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या व्यक्तीमुळे प्रकार उघडकीस?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला रात्रभर थांबूनही दाखला मिळाला नसल्याचा आरोप आहे. दाखला मिळण्यास विलंब का होत आहे, हे पाहण्यासाठी संबंधित व्यक्ती विभागात गेल्यानंतर कथित पार्टीचा प्रकार समोर आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळतात की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा

व्हिडीओमध्ये चेहरा दिसणारी व्यक्ती कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. व्हिडीओतील दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. तथापि, संबंधित व्यक्तींची ओळख, कथित मद्यसेवन आणि घटनेची पार्श्वभूमी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे निष्कर्षापूर्वी निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे आहे.

रुग्णालय प्रशासन कारवाई करणार का?

शवविच्छेदन विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी मद्यपान झाल्याचा आरोप खरा ठरल्यास हा रुग्णालयातील शिस्तीचा आणि प्रशासकीय जबाबदारीचा गंभीर प्रश्न ठरू शकतो. त्यामुळे संबंधित व्हिडीओची सत्यता तपासणे, त्या वेळच्या उपस्थितीची नोंद पडताळणे आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी करणे आवश्यक आहे.

दारु पार्टी करणाऱ्यांना बंडतर्फ करा :- सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या संताप शवविच्छेदन विभागात कथित दारू पार्टी झाल्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमस्वरूपी बंडतर्फ करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी याच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे

या प्रकरणी वायसीएम रुग्णालय प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका काय भूमिका घेतात, संबंधितांची चौकशी होते का आणि दोष सिद्ध झाल्यास कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!