रस्ता रुंदीकरणाला समंजस साथ; व्यावसायिकांनी उचलला स्वतःहून साहित्य हलवण्याचा पुढाकार
सुनील पाटील :
रस्त्याचे रुंदीकरण म्हणजे केवळ दगड-विटांचे बांधकाम नव्हे, तर शहराच्या प्रगतीची नवी धमनी असते. मुंबई–जुना पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा असाच विकासात्मक टप्पा सध्या आकार घेत आहे. या कामासाठी प्रशासनाने रस्तालगतच्या व्यावसायिकांना नोटिसा दिल्यानंतर, कोणत्याही कटुतेची किंवा सरकारी कारवाईची वाट न पाहता, स्थानिक दुकानदारांनी अत्यंत समंजसपणाने स्वतःहून आपले साहित्य हलवून जागा मोकळी करण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय आणि उदरनिर्वाहाची साधने सुरक्षित राहावीत, या व्यावहारिक जाणिवेतून व्यावसायिकांनी हा निर्णय घेतला आहे. सरकारी यंत्रणेचा बडगा उगारला जाण्यापूर्वीच, आपले आर्थिक आणि भौतिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी दाखवलेली ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.
याच भागातील ‘साई स्नॅक्स ’च्या परिसरातही सध्या अशीच लगबग पाहायला मिळत असून, व्यावसायिक स्वतःच्या हाताने आपली दुकाने रिकामी करून विकासाच्या या प्रवाहात आपले योगदान देत आहेत.
या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे भविष्यात प्रवाशांचा आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व वेगवान होणार आहे. विकासाच्या या प्रवासात व्यापाऱ्यांनी दाखवलेला हा संयम आणि सहकार्याची भावना समाजमनाला सुखावणारी आहे. आता या समंजसपणाला प्रशासनाकडूनही तितक्याच संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.






























