नावात ‘केअर’, धंद्यात मात्र जीवघेणा खेळ! जेजुरीच्या इंडुकेअर कंपनीचे परवाने एफडीएने पुन्हा केले रद्द
प्रेस मीडिया लाईव्ह:
पुणे जिल्ह्यातील जेजुरी अतिरिक्त एमआयडीसी मध्ये रुग्णांच्या जिवाशी अक्षरशः खेळ मांडला गेला होता. आजाराने कण्हणाऱ्या, मरणाच्या दारात उभ्या असलेल्या माणसाने ज्या गोळीवर विश्वास ठेवून ती घशाखाली उतरवावी, त्या गोळीतच जर औषधाचा थेंबही नसेल, तर याहून मोठा विश्वासघात आणि पातक ते कोणते? ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन’ या कंपनीने हाच निर्घृण प्रकार चालवला होता. अखेर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) २३ नोव्हेंबर २०२६ रोजी या कंपनीचे सर्व उत्पादन परवाने पुन्हा रद्द करून या पापाचा घडा फोडला आहे.
कंपनीचे नाव मोठे लक्षणे खोटे, अशीच काहीशी अवस्था या इंडुकेअरची झाली आहे. नावात ‘केअर’ आणि ‘रिसर्च’ असे गोंडस शब्द मिरवणाऱ्या या कंपनीने प्रत्यक्षात मात्र सामान्य माणसाच्या आयुष्याची माती करण्याचेच ‘संशोधन’ चालवले होते. शासनाची कोणतीही परवानगी न घेता तब्बल नऊ औषधांचे उत्पादन आणि विक्री करण्याचा बेकायदेशीर कारखाना येथे राजरोसपणे सुरू होता. जेव्हा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर छापा टाकून तपासणी केली, तेव्हा समोर आलेले सत्य अंगावर काटा आणणारे होते; कारण ही औषधे बनावट, चुकीचे लेबल लावलेली किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले.
वेदनेने तळमळणाऱ्या रुग्णासाठी ज्या ‘आयबुकेअर प्लस’ या गोळीची निर्मिती केली गेली, त्या गोळीत वेदनाशामक ‘आयबुप्रोफेन’ हा मूळ घटकच नव्हता! म्हणजे रुग्ण वेदनेने तडफडत राहावा आणि यांनी केवळ खडूच्या गोळ्या विकून आपल्या तिजोऱ्या भराव्यात, हाच यांचा धंदा. इतकेच नव्हे, तर अशक्तपणा घालवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘केअरव्हिटा-एम’ या औषधातही निर्धारित जीवनसत्त्वे आणि आवश्यक घटकांचा पत्ताच नव्हता.
हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि पचनसंस्थेच्या आजारांवर ज्या औषधांचा आधार रुग्ण घेत असतात, त्या औषधांमध्येही मुख्य घटकांचे प्रमाण कमी किंवा त्रुटी आढळून या नफेखोरांनी माणुसकीला काळीमा फासला आहे. खिशातला शेवटचा पैसा खर्च करून औषध विकत घेणाऱ्या गरीब रुग्णाला आपण गोळी नाही, तर निव्वळ फसवणूक देत आहोत, याची किंचितही लाज या कंपनीच्या चालकांना वाटली नाही.
अखेर या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एफडीएने कंपनीचे सर्व उत्पादन, पॅकिंग, चाचणी आणि वितरण तात्काळ थांबवण्याचे कठोर आदेश दिले आहेत. या निर्दयी कारभाराबद्दल ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ अंतर्गत कंपनीवर खटला प्रस्तावित करण्यात आला आहे. परवाने रद्द झाले, कारखाना बंद पडला; पण ज्या रुग्णांनी या बनावट गोळ्या खाऊन आपल्या जिवावर बेतवून घेतले असेल, त्यांच्या वेदनांची भरपाई कोण करणार, हा प्रश्न मात्र आजही अनुत्तरितच आहे!






























