पैशांच्या हवसेपोटी माणुसकीचा लिलाव! बदलापुरात मातांच्या शरीराशी खेळणाऱ्या आधुनिक ‘पुतना’ गजाआड!

सुनील पाटील :
ज्या महाराष्ट्राने जगाला ‘मातृदेवो भव’चा मंत्र दिला, त्याच मातीत आज माता-भगिनींच्या शरीराचा बाजार मांडला जावा? छे! केवढा हा भयंकर अध:पात! बदलापूरच्या ज्युवेली गावात माणुसकीला काळिमा फासणारा एक असा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे, जो ऐकून कोणत्याही सुसंस्कृत माणसाचे रक्त सळसळून उठेल. गरिबीचा फायदा घेऊन, पैशांचे आमिष दाखवून हतबल महिलांच्या शरीरात अनधिकृतपणे ‘स्त्री-बीजांची’ शेती करणाऱ्या तीन आधुनिक ‘पुतनांना’ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी डीसीपी सचिन मोरे अधिक तपास करीत आहेत

शरीराची प्रयोगशाळा आणि लुटारू टोळी!
या टोळीचा कारभार पाहिला की अंगावर काटा येतो. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबूकस्वार आणि मंजुषा वानखेडे या त्रिकुटाने जणू काही मानवी शरीराचा कसाबखानाच उघडला होता. गरजू महिलांना गाठायचे, त्यांना पैशांची हाव दाखवायची आणि मग कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय त्यांच्या शरीरात औषधांचा आणि इंजेक्शनचा मारा करायचा! कशासाठी? तर फक्त त्यांच्या अंडाशयात जास्तीत जास्त स्त्री-बीजे तयार व्हावीत आणि ती आयव्हीएफ (IVF) केंद्रांना विकून स्वतःची खिसे भरता यावीत! हा व्यापार आहे की जिवंत माणसांच्या रक्ताचा लिलाव?

पोलीस कारवाई आणि जप्त झालेला ‘पापपिटारा’
एका पीडित महिलेने हिंमत दाखवून उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि या सैतानी कृत्याचा भांडाफोड झाला. बदलापूर पोलिसांनी तत्परता दाखवत सुलक्षणा गाडेकरच्या अड्ड्यावर छापा टाकला. तिथे जे काही सापडले ते पाहून कायद्याचे रक्षकही चक्रावून गेले. खोटी प्रतिज्ञापत्रे, बेकायदेशीर सोनोग्राफी अहवाल आणि अनेक महिलांचे फोटो… जणू काही एका मोठ्या गुन्हेगारी साम्राज्याचा हा उंबरठाच! न्यायालयाने या तिन्ही आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीची ‘हवा’ खायला पाठवले आहे.

आमचा सडेतोड सवाल!
आता प्रश्न उरतो तो हा की, या रॅकेटमध्ये फक्त याच तीन महिला आहेत की पडद्यामागे काही ‘पांढरपेशी’ डॉक्टरांचेही हात काळे झाले आहेत? कोणत्या आयव्हीएफ सेंटर्सनी या बेकायदेशीर स्त्री-बीजांची खरेदी केली? गरिबांच्या लाचारीचा फायदा घेऊन स्वतःचे इमले चढवणाऱ्या अशा नराधमांना चौकात उभे करून जाब विचारला पाहिजे.
बदलापूरची ही घटना म्हणजे समाजाच्या सुन्न झालेल्या संवेदनांचे लक्षण आहे. आता आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या व्यापाराचे समूळ उच्चाटन करावे, हीच महाराष्ट्राची इच्छा आहे!































