बँका सुखावल्या, बचत गट चमकले; इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनी योजनांचा ‘डिजिटल’ पाऊस..!


बँका सुखावल्या, बचत गट चमकले; इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनी योजनांचा ‘डिजिटल’ पाऊस..!

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्थानिक राजीव गांधी भवन येथे संपन्न झालेल्या या भव्य मेळाव्याद्वारे एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.

या मेळाव्याचे उद्घाटन महापालिकेचे लाडके उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार आणि सहाय्यक आयुक्त सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या लोककल्याणकारी उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पीएम स्वनिधी योजना, पी.एम. मातृ वंदना योजना, पी.एम. जीवन ज्योती विमा योजना, पी.एम. जनधन योजना, पी.एम. जननी सुरक्षा योजना, पी.एम. सुरक्षा विमा योजना, पी.एम. श्रमयोगी मानधन योजना आणि ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ यांसारख्या योजनांचा समावेश होता. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पीएम स्वनिधी योजने अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना कर्ज सुविधा आणि डिजिटल व्यवहारांवर मिळणाऱ्या कॅशबॅकच्या लाभाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पीएम स्वनिधी योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा गौरव हे होते. यामध्ये भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयसीआयसीआय (ICICI) बँक यांना सन्मानपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच, ज्या महिला बचत गटांनी उत्तम पद्धतीने कामकाज चालवून घेतलेल्या कर्जाची वेळेत व नियमित परतफेड केली, अशा आदर्श गटांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना शासनाच्या या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास शहरातील पथविक्रेते, नागरिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी एन.यू.एल.एम. चे व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, समुदाय संघटक सुरेश कांबळे, सन्मित निंबाळकर, प्रीती सूर्यवंशी आणि शुभांगी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!