तेलामधले काळेबेरे’ संपणार; तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना ‘शुद्ध’ दणका!


तेलामधले काळेबेरे’ संपणार; तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना ‘शुद्ध’ दणका!

सुनील पाटील

मुंबई: अहो खवय्यांनो, सुटीच्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाऊन ढेकर देत बाहेर पडताना, आपण नक्की काय खाल्लंय याचा कधी विचार केलाय का? ‘बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा’ या उक्तीप्रमाणे, बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या हॉटेलच्या आतल्या किचनमध्ये डोकावून पाहिलं, तर दोन दिवस जेवणावरची वासना उडेल! पण आता काळजी नसावी. कारण, आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता या हॉटेलवाल्यांची पिसं काढायचं ठरवलं आहे. त्यांनी एक असा ‘ऐतिहासिक’ फतवा काढलाय, की ज्यामुळे अनेक हॉटेल मालकांच्या कपाळावर घाम आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे!

मुंढे साहेबांच्या खात्यानं नुकतीच एक विशेष मोहीम राबवली. त्यात त्यांना काय दिसलं? तर चहापेक्षा किटली काळी आणि तेलापेक्षा कढई काळी! एकदा कढईत तेल ओतलं की ते तेल काळ्याकुट्ट डांबरासारखं दिसेपर्यंत त्यात भजी आणि वडे तळण्याचा आपला जुना राष्ट्रीय खेळ. शिवाय, खोकणाऱ्या आणि शिंकणाऱ्या आचाऱ्यांच्या हातचे ‘हायजिनिक’ पदार्थ, आणि उकडलेल्या बटाट्याशेजारीच कच्च्या भाज्यांचा संसार! हे सगळं पाहून साहेबांचा पारा चढला नसता तरच नवल.

हा आदेश फक्त मोठ्या हॉटेलांनाच नाही, तर गल्लीतल्या टपऱ्यांपासून ते पंचतारांकित रेस्टॉरंटपर्यंत सगळ्यांनाच लागू होणार आहे. ढाबे, कॅन्टीन, बेकरी, मिठाईची दुकानं, आणि हल्ली ते ‘स्वीगी-झोमॅटो’ वाले जे घरातूनच ‘क्लाउड किचन’ चालवतात ना, ते सगळे आता रडारवर आले आहेत. “आम्ही फक्त पार्सल देतो, आमचं हॉटेल नाही” अशी पळवाट आता चालणार नाही. जिथे जेवण शिजतं आणि विकलं जातं, तिथे मुंढेंचा कायदा चालणार!

या नव्या ‘फूड-पुराणात’ अनेक कडक नियम आणले आहेत. लायसन्स असल्याशिवाय आता हॉटेल किंवा रेस्टॉरंट उघडता येणार नाही, म्हणजे विनापरवाना स्वयंपाकघरांना आता कुलूप लागणार! कामगारांची वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे; नाहीतर आचाऱ्याचा आजार ग्राहकाच्या ताटात पार्सल मिळायचा!

सर्वात मोठा झटका त्या हॉटेलवाल्यांना बसलाय जे पाण्यासाठी खिसे कापतात. हॉटेलमध्ये गेल्यावर साधं पाणी मागितलं की, “पाणी नाही, बिसलेरी घ्या” असा उर्मट सल्ला देणाऱ्यांची आता खैर नाही. ग्राहकांना मोफत, स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देणं हॉटेलवाल्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच, वापरलेलं खाद्यतेल पुन्हा पुन्हा वापरता येणार नाही. तेलाचा वास येऊ लागला किंवा ते काळं दिसू लागलं, तर ते फेकून द्यावं लागेल, ज्यामुळे लोकांच्या नसा ब्लॉक करण्याचा हा काळा उद्योग आता थांबेल. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकाच ठिकाणी गळ्यात गळे घालून ठेवता येणार नाहीत आणि रस्त्यावरच्या कोणत्याही भुरट्या व्यापाऱ्याकडून स्वस्तात कच्चा माल आणणे चालणार नाही.

इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांतून घरपोच अन्न विकणाऱ्यांचीही कोंडी करण्यात आली असून त्यांना प्रत्येक पदार्थावर कॅलरीजची माहिती द्यावी लागेल. तसेच, मोठ्या कंपन्यांना दरवर्षी त्यांच्या किचनचे ‘ऑडिट’ करणे सक्तीचे केले आहे.

एकंदरीत काय, तर तुकाराम मुंढे यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांच्या नाड्या आवळल्या आहेत. नियम न पाळल्यास थेट कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दमच त्यांनी दिलाय. आता तरी गरिबाच्या वडापावपासून ते श्रीमंतांच्या पिझ्झापर्यंत सर्वच गोष्टी ‘खरंच’ स्वच्छ आणि शुद्ध मिळतील, अशी आशा करूया. खवय्यांनो, आता बिनधास्त खा, कारण किचनमध्ये आता मुंढे साहेबांची नजर आहे!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!