खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पिंपरीत पत्रकारांचे कडकडीत आंदोलन; राजीनाम्याची जोरदार मागणी


खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पिंपरीत पत्रकारांचे कडकडीत आंदोलन; राजीनाम्याची जोरदार मागणी

पिंपरी : चंद्रशेखर पात्रे :

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अत्यंत अवमानकारक, शिवराळ आणि आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आता पश्चिम महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या सत्तेच्या मुजोरीविरोधात पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार बांधवांनी बुधवारी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन केले. “खासदार संजय दिना पाटील राजीनामा द्या!”, “पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो!” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाचाळवीर खासदाराची हकालपट्टी करून तातडीने राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या जाहीर आंदोलनात पिंपरीतील पत्रकार संघाने एकमुखाने सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा समाचार घेतला.

आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत बोलताना ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी राजकीय नेत्यांच्या घसरलेल्या पातळीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आता सुसंस्कृतपणा शिल्लक राहिलेला नाही. एकमेकांना जाहीर शिव्या देणारे नेते आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लक्ष्य करत आहेत. संजय दिना पाटील यांनी जी शिवराळ भाषा वापरली, त्याहीपेक्षा टोकाची भाषा आम्हाला बोलता येते, पण आम्ही मर्यादा बाळगतो. सत्तेच्या मस्तीत जर कोणी पत्रकारांना धमकावणार असेल, तर महाराष्ट्र आणि पिंपरीचे पत्रकार ती मुजोरी कधीही खपवून घेणार नाहीत.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांनी लोकप्रतिनिधींच्या या भाषेचा तीव्र शब्दात निषेध करत अशा खासदाराला संसदेत बसण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी केली. तर पत्रकार संतोष मिश्रा यांनी, प्रश्न विचारणे हेच पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे आणि जीवावर बेतले तरी आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत राहू, अशा फुकटच्या धमक्यांना पत्रकार भीक घालत नाहीत, अशा कडक शब्दांत सुनावले. पत्रकार अविनाश चिलेकर यांनीही भाजप अशा वाचाळवीरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला, तर बाळासाहेब ढसाळ यांनी सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी आता पत्रकार मागे हटणार नाहीत, असा थेट इशारा दिला.

या आंदोलनात गोविंद वाकडे, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, संतोष मिश्रा, रोहित आठवले, बाळासाहेब ढसाळ, विजय जगताप, अनिल वडघुले यांनी आपल्या धारदार भाषणांनी वातावरण तापवले. याशिवाय आंदोलनात मिलिंद कांबळे, अमोल काकडे, नरेश नातू, सुरज कसबे, राजेश स्टीफन, अतुल मारवाडी, प्रसन्न तरडे, विकास शिंदे, भानुदास हिवराळे, विश्वजीत पोल्ले, पराग कुंकूलोळ यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील असंख्य डिजिटल व प्रिंट मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या संजय दिना पाटील यांच्यावर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा शेवटी पत्रकार बांधवांनी दिला आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!