भाग्योदय नगर मध्ये काँग्रेस उमेदवारांचे जल्लोषी स्वागत; सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप

पुणे: प्रतिनिधी कोंढव्यातील भाग्योदय नगर परिसरात निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, गल्ली नंबर ९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत, मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाबद्दल गाऱ्हाणी मांडली.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षावर मतदारांचा रोष
प्रचारादरम्यान उमेदवार तसलीम शेख, आसिया मणियार, काशिफ सय्यद आणि तहेजीब सिद्दीकी यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी तक्रार केली की, सत्तेची मुदत संपल्यानंतर अनेक नगरसेवकांनी या भागाकडे पाठ फिरवली आहे. भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असून पार्किंगच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
‘डी.पी. रस्ता’ पूर्ण करण्याचे मोहसीन शेख यांचे आश्वासन
कोंढव्याचे स्टार प्रचारक आणि युवा नेते मोहसीन शेख यांच्यासमोर नागरिकांनी प्रलंबित डी.पी. रस्त्याचा प्रश्न मांडला. १९८७ साली मंजूर होऊनही गल्ली नंबर ९ मधील हा रस्ता अद्याप कागदावरच आहे. यावर बोलताना मोहसीन शेख म्हणाले:

“तुम्ही कोंढव्यातून काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, हा प्रलंबित डी.पी. रस्ता सुरू करण्याची जबाबदारी आमची आहे. नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
त्यांच्या या आश्वासनानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दर्शवला.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
कोंढव्याच्या विविध भागांतून काँग्रेसला वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रलंबित विकासकामे आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून, प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.


























