पुरे झाले तुमचे जुमले आणि तमाशे; आता जनतेला खुणावतायत काँग्रेसचेच दिवस!”


पुरे झाले तुमचे जुमले आणि तमाशे ; आता जनतेला खुणावतायत काँग्रेसचेच दिवस!”

मेहबूब सर्जेखान  ज्येष्ट संपादक 

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या जो काही ‘रंगाचा खेळ’ आणि ‘शब्दांचा बाजार’ सुरू आहे, तो बघून कुणाही सुज्ञ माणसाच्या डोक्याचे दही व्हावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सामान्य माणूस चहूबाजूंनी पिचला गेला आहे. महागाईच्या वरवंट्याखाली तो भरडला जातोय, बेरोजगारीच्या विळख्यात तो गुदमरतोय आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात तीच ती जुनी माणसे नव्या रूपात लोळताना पाहून त्याला आता मळमळू लागले आहे.

कौतुक करावे तितके थोडेच! कालपर्यंत जे लोक ओरडून सांगत होते की ‘आधार कार्ड’ म्हणजे देशाला धोक्यात टाकणारे पाऊल आहे, तेच लोक आज सत्तेवर येताच त्याच ‘आधार’च्या गळ्यात गळे घालून बसले आहेत. विरोधात असताना ज्या योजनेला तुम्ही ‘काळा कायदा’ म्हणून हिणवले, आज सत्तेची उब मिळताच त्याच कार्डशिवाय माणसाला श्वास घेणेही कठीण करून ठेवले आहे. आधार कार्ड नसेल तर रेशन मिळणार नाही, आधार नसेल तर बँक खाते चालणार नाही – शेवटी ज्या काँग्रेसला तुम्ही विरोध केला, त्याच काँग्रेसच्या ‘आधार’चा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचे सरकार चालवता येईना! हा केवढा मोठा विरोधाभास आणि ही केवढी मोठी जनतेची थट्टा!

माणूस कंटाळला आहे! तो वैतागला आहे त्या पोकळ घोषणांना, तो थकला आहे त्या डिजिटल स्वप्नांना आणि तो आता विटला आहे त्या दररोजच्या ‘पक्षांतराच्या’ तमाशाला. सकाळी उठल्यावर कोणता नेता कोणत्या पक्षात आहे, हे ओळखण्यासाठी आता राजकीय पंचांग पाहायची वेळ आली आहे. अशा या अस्वस्थ वातावरणात आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच कुजबुज सुरू झाली आहे, एकच चर्चा जोरात वाहू लागली आहे— “आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही!”

अहो, ज्यांना इतिहास माहीत नाही, त्यांनी लक्षात ठेवावे की या देशाची वीण काँग्रेसने विणली आहे. आज जे लोक ‘काँग्रेसमुक्त’ भारताच्या वल्गना करत होते, त्यांनाच आता आपल्या पक्षात काँग्रेसची माणसे घेतल्याशिवाय झोप लागत नाही, हा केवढा मोठा दैवदुर्विलास! हे तुमचे ‘जुमले’ आता जनतेने पार ओळखून काढले आहेत. खिशात पैसे नाहीत आणि गळ्यात महागाईची फास, अशा वेळी तुमचे ‘अच्छे दिन’चे पाढे आता कुणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.

जनता का फिरली..? जनतेचा हा जो कल बदलतोय, तो काय उगाच? जेव्हा सासामान्यांच्या ताटातील भाजी महाग होते, तेव्हा त्यांना त्या ‘हाताची’ आठवण येते ज्याने किमान सन्मानाने जगण्याची हमी दिली होती. जेव्हा समाजात दुहीची बीजे पेरली जातात, तेव्हा त्यांना त्या तिरंग्याची आठवण येते जो सर्वांना एकत्र घेऊन चालतो. लोकांना आता ‘इव्हेंट’ नको आहेत, त्यांना ‘अॅक्शन’ हवी आहे. त्यांना ‘मन की बात’ नको आहे, त्यांना त्यांच्या पोटाची बात ऐकणारा माणूस हवा आहे.

आज काँग्रेसच्या छताखाली पुन्हा एकदा लोक जमू लागले आहेत.  कारण माणसाला शेवटी शांतता हवी असते. जो गोंधळ, जो कलह आणि जी भीती सध्या निर्माण झाली आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव सुरक्षित किनारा वाटू लागला आहे.

पर्याय नाही? हो , पर्याय नाही! कारण ज्यांच्याकडे सत्ता दिली, त्यांनी सत्तेचा ताम्रपट मिळाल्यासारखा धुमाकूळ घातला. ज्यांनी आश्वासनं दिली, त्यांनी ती वाऱ्यावर सोडली. आता जनतेला जाणवू लागलंय की, जुनं ते सोनं होतं. ती शिस्त, ती विचारसरणी आणि तो सर्वसमावेशक स्वभाव फक्त काँग्रेसकडेच आहे.

म्हणूनच म्हणतो, आता वारे फिरले आहे . लोकांच्या मनातली ही धुमसती आग आता ठिणगी बनून बाहेर पडू लागली आहे. ही ‘चर्चा’ नसून तो ‘निश्चय’ आहे. जनता आता सज्ज झाली आहे, पुन्हा एकदा त्याच ‘हाताला’ साथ देण्यासाठी, कारण अनुभवाच्या शाळेत तावून सुलाखून निघालेला माणूस आता ठणकावून सांगतोय— “पुरे झाले तुमचे तमाशे, आता काँग्रेसचीच वेळ!”

बघूया, आता या चर्चेचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत कधी होतेय ते. पण एक नक्की, परिवर्तनाची पहाट आता लांब नाही!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!