अग्रलेख : करांच्या महापुरात बुडालेली लोकशाही

“अती तेथे माती” ही म्हण आपल्या पूर्वजांनी उगाच शोधून काढलेली नाही. पण आजच्या सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राजकारण्यांना ती माती डोळ्यात गेल्याशिवाय समजणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या राजकारणाचे स्वरूप पाहिले की अंगाचा तिळपापड होतो. “नाक कापले गेले तरी भोके शिल्लक आहेतच की,” अशा निर्लज्ज अविर्भावात वावरणारी ही मंडळी पाहून वाटते, की यांना माणुसकीशी आणि नीतिमत्तेशी काही देणेघेणे उरले आहे की नाही? पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा तर या देशात आता ‘अंत्यविधी’च झाला असून संपूर्ण देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे! या आमच्या मनातील शंका नाहीत, तर पिचलेल्या जनतेच्या काळजातून उमटलेल्या या ‘तिखट’ प्रतिक्रिया आहेत!
माणुसकी कुठे मिळेल का हो..?
आजचा सर्वात मोठा आणि भीषण प्रश्न हाच आहे! बाजारात चड्डी-बनियानवर कर आहे, खाण्यापिण्याच्या अन्नावर कर आहे, अगदी सुलभ शौचालयालाही कराच्या विळख्यातून सोडले नाही. पण ज्या लोकशाहीत माणसाच्या जगण्यापेक्षा ‘डिजिटल कार्डांना’ जास्त किंमत मिळते, जिथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे, तिथे माणुसकी शोधूनही सापडत नाही. राजकारण्यांच्या संवेदना मेल्या आहेत आणि सामान्य जनता करांच्या ओझ्याखाली दबून मेली आहे. सांगा, या देशात आता माणुसकीची एखादी ठिणगी तरी शिल्लक उरली आहे का? की ती सुद्धा सरकारने ‘जीएसटी’ लावून जप्त केली आहे?
‘जाऊ तेथे खाऊ’ची राक्षसी प्रवृत्ती..!आज समाजात ‘जाऊ तेथे खाऊ’ अशी प्रवृत्ती बळावली आहे. भ्रष्टाचाराने केवळ सरकारी तिजोरीच पोखरली नाही, तर माणसाच्या मनाचाही तळ गाठला आहे.
खाण्यापिण्यावर डल्ला अन् जनतेच्या पोटाला खीळ!
प्रगतीचे ढोल बडवणाऱ्या या सरकारला लाज वाटायला हवी! ज्या देशात गरिबाला दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, तिथे तुम्ही तांदूळ, डाळ, दूध आणि दह्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवरही करांचा ‘राक्षस’ बसवला आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंवर भरमसाठ कर लावून तुम्ही कसली ‘स्मार्ट’ संस्कृती मिरवताय? सामान्य माणसाने पोट भरायचे की तुमच्या करांच्या तिजोऱ्या भरायच्या? हा प्रश्न विचारतानाही आता भीती वाटू लागली आहे, कारण लोकशाही आता करांच्या महापुरात गटांगळ्या खात आहे!
अब्रूवर घाला: चड्डी-बनियानवरही कर ?
हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा माणसाच्या अंगावरच्या कपड्यांवरही कराची कात्री चालवण्यात आली. चड्डी आणि बनियानवर कर? काय ही तुमची प्रगती? गरिबाची उघडी नागडी अब्रू झाकणाऱ्या वस्त्रावरही तुमची नजर पडली? आता फक्त दाढी आणि केस कापण्यावर ‘हजामत टॅक्स’ लावायचाच बाकी ठेवला आहे. सुलभ शौचालयालाही तुम्ही करमुक्त ठेवू शकत नाही, याचा अर्थ माणसाने नैसर्गिक विधीसाठीही आता तुमच्या ‘जीएसटी’च्या रांगेत उभे राहावे, अशी तुमची मग्रूरी आहे का? जनता वैतागून विचारतेय, जिथे विसर्जनालाही किंमत मोजावी लागते, तिथे माणसाच्या जगण्याला काय किंमत उरली आहे?
आता तरी सावध व्हा..!
लक्षात ठेवा, जनता भोळी आहे, पण वेडी नाही. ही चीड, हा संताप आणि या तिखट प्रतिक्रिया उद्याच्या क्रांतीची ठिणगी आहेत. ‘अती’ झाली आहे, आता तुमची ‘माती’ होण्याची वेळ जवळ आली आहे. ज्या दिवशी हा सामान्य माणूस करांच्या ओझ्याखाली दबून मरण्याऐजी पेटून उठेल, त्या दिवशी तुमच्या या ‘डिजिटल’ किल्ल्यांची माती व्हायला वेळ लागणार नाही. जनतेचा अंत पाहणे थांबवा, अन्यथा इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही..!



























