रातोरात श्रीमंत होण्याच्या ओढीनं निघाले होते; रायगड गुन्हे अन्वेषणने थेट लॉकअपमध्येच पोहोचवले


रातोरात श्रीमंत होण्याच्या ओढीनं निघाले होते; रायगड गुन्हे अन्वेषणने थेट लॉकअपमध्येच पोहोचवले

(सुनील पाटील)

आमच्या देशात वीज मंडळ (MSEB) आणि त्यांचे ट्रान्सफॉर्मर हे अगदी उघड्यावर पडलेल्या अनाथ लेकरासारखे असतात. त्यांना ना राखणदार, ना धड कुंपण! रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर एखादा ट्रान्सफॉर्मर बिचारा ऊन-पावसात उभा असतो. आता अशा ‘बिना-वॉचमन’च्या सरकारी मालमत्तेकडे पाहून, शिळफाट्याच्या काही सुजाण सुपुत्रांच्या मनात अचानक ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली. कारण काय, तर हल्ली बाजारात नवीन तांब्याचा भाव प्रति किलो चक्क बाराशे रुपयांच्या पार गेलाय, आणि भंगार तांब्यालाही हजाराचा भाव मिळतोय! मग काय, ‘रातोरात श्रीमंत’ होण्याच्या ओढीनं या बहाद्दरांनी ट्रान्सफॉर्मर उचकटून तांबे पळवण्याचा एक सुंदर घरगुती उद्योगच सुरू केला.

रोहा, महाड आणि पेण या तिन्ही तालुक्यांतल्या ट्रान्सफॉर्मरमधून मिळून तब्बल ५१० किलो तांब्याची वायर या चोरांनी अत्यंत निष्ठेने ‘मुक्त’ केली. ‘आपलीच मालमत्ता’ समजून ती शिळफाट्याला नेऊन विकलीही जात होती. पण म्हणतात ना, “चोराच्या उलट्या पावलांपेक्षा कायद्याचे हात जरा जास्तच लांब असतात.”

रायगडच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) अलिबागचे पथक आणि विशेषतः सहायक फौजदार श्री. संदीप पाटील हे काही चहा पिऊन सुस्त बसणारे पोलीस नाहीत. त्यांच्या गुप्तहेरांनी अचूक पत्ता दिला आणि पोलिसांनी थेट शिळफाटा गाठला.

पोलिसी खाक्या आणि ‘ओके बाय थँक्यू’

पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं आहे, त्या बहाद्दरांमध्ये मुख्य कष्टकरी म्हणून इमरान वारीसअली खान (वय २६, रा. शिळफाटा, ठाणे) याने ट्रान्सफॉर्मरमधून तांबे काढण्याचे अंगमेहनतीचे काम केले. तर समीम महमद सरीफ खान (वय ३२, रा. शिळफाटा, ठाणे) हा त्या तांब्याचा ‘उदार’ स्वीकारकर्ता (अर्थात भंगारवाला) बनला होता. या दोघांना अलिबागच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अशा काही प्रेमाने ताब्यात घेतले की, चोरांचा रातोरात श्रीमंत होण्याचा सगळा ‘बिझनेस प्लॅन’ एका झटक्यात ‘ओके बाय थँक्यू’ झाला!

उघडकीस आलेली ‘ताम्र-पुराणे’

या टोळीने रायगड जिल्ह्यात एकूण तीन मोठ्या आवृत्या (चोऱ्या) यशस्वीपणे पार पाडल्या होत्या, ज्यांचा हिशोब पोलिसांनी आता चुकता केला आहे. पहिली आवृत्ती रोहा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. नं. ७९/२०२६, BNS ३०३(२)) नोंद असून, तेथून तब्बल १५० किलो तांब्याची वायर पळवली होती. दुसरी आवृत्ती महाड शहर पोलीस ठाण्याच्या (गुन्हा रजि. नं. २६/२०२६, विद्युत अधिनियम १३६) हद्दीत घडली, जिथे विक्रमी २५० किलो तांब्याची वायर लंपास केली गेली. आणि तिसरी आवृत्ती पेण पोलीस ठाणे (गुन्हा रजि. नं. ५२/२०२६, BNS ३०३(२)) अंतर्गत ११० किलो तांब्यावर हात साफ करून पूर्ण झाली होती.

कामगिरी करणारे ‘सज्जन’ पथक..

सरकारी मालमत्तेची अशी ‘तांब्याची खाण’ करणाऱ्या या चोरांना रोहा पोलिसांच्या सुपूर्द करण्याचे मोलाचे काम ज्या कार्यक्षम पथकाने केले, त्यांची नावे रायगडकरांनी लक्षात ठेवान्या हवीत. या मोहिमेचे नेतृत्व सपोनि/ मानसिंग पाटील यांनी केले, तर ज्यांना अचूक खबर लागली ते सहा.फौ./ संदीप पाटील, आणि त्यांना साथ देणारे पो.हवलदार / ७९५ प्रतीक सावंत व पो.कॉन्स्टेबल / १८४९ प्रदीप खरात या पथकाने ही चोख कामगिरी बजावली.

एमएसईबीने ट्रान्सफॉर्मरला वॉचमन ठेवला नसला, तरी रायगड पोलिसांचे डोळे उघडे आहेत, हे या शिळफाट्याच्या अट्टल गुन्हेगारांना आता रोहा लॉकअपमध्ये बसून नक्कीच समजले असेल!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!