इचलकरंजीचा सुवर्णक्षण: ॲड. अलका स्वामी यांना मुंबईत मानाचा ‘वीरशैव श्री’ गौरव


इचलकरंजीचा सुवर्णक्षण: ॲड. अलका स्वामी यांना मुंबईत मानाचा ‘वीरशैव श्री’ गौरव!

मुंबई : राजकारणात आणि समाजकारणात अनेकांना पदं मिळतात, पण काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने त्या पदाची उंची इतकी वाढवतात की, पुरस्कारांनाच त्यांच्यापर्यंत धावत यावं लागतं! असाच एक अत्यंत मंगलमयी आणि गोड योग मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जुळून आला, जेव्हा इचलकरंजीच्या सामाजिक व राजकीय पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या माजी नगराध्यक्ष, बँकेच्या चेअरमन तथा विद्यमान नगरसेविका **ॲड. अलका अशोक स्वामी** यांना ऑल इंडिया वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने **‘वीरशैव श्री’** या अत्यंत मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मंत्रालयासमोर रंगलेल्या या भव्य सोहळ्याचे अध्यक्षपद कर्नाटक राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा महासभेचे अध्यक्ष ना. ईश्वर खंदारे यांनी भूषवले. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष तथा माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या शुभहस्ते हा मानाचा गौरव ॲड. अलका स्वामी यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास काशी पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे पावन आशीर्वाद लाभले. यासोबतच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती, केएलई सोसायटीचे चान्सलर डॉ. प्रभाकरजी कोरे, श्री. मंगेश चिवटे आणि पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांसारख्या विविध क्षेत्रांतील मातब्बर दिग्गजांची विशेष उपस्थिती होती.

इचलकरंजी शहराच्या सार्वजनिक जीवनात कधी प्रथम नागरिक (नगराध्यक्ष) म्हणून, कधी बँकेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळताना, तर कधी नगरसेविका म्हणून ॲड. अलका स्वामी यांनी केलेले काम महिला सक्षमीकरण आणि समाजहितासाठी नेहमीच दीपस्तंभ ठरले आहे. त्यांच्या याच निरलस, संयमी आणि समर्पित लोकसेवेची दखल घेत वीरशैव लिंगायत समाजाने हा सर्वोच्च सन्मान त्यांना बहाल केला आहे

या बहुमानामुळे इचलकरंजी शहराच्या लौकिकात आणखी एक सुवर्णमयी मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण शहरासह वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व स्तरांतून ॲड. अलका स्वामी यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!