विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा अन् गुणवंतांचा गौरव; विविध संस्था व शाळांमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न

देहूरोड: चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड, देहूगाव, विकासनगर व लगतच्या परिसरात ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा व देशभक्तीपर भाषणांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
**देहूनगर पंचायतीत ध्वजारोहण**
देहूनगर पंचायतीच्या कार्यालयात सकाळी ८:३० वाजता नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी मुख्याधिकारी चेतन कोंडे, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे, माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, माजी नगराध्यक्षा प्रियंका मोरे, नगरसेवक-नगरसेविका, संत तुकाराम विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणे सादर करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
शाळा आणि सामाजिक संस्थांमधील उपक्रम..
विस्डम इंग्लिश मीडियम हायस्कूल:
देहूरोड येथील साऊथ इंडियन असोसिएशनच्या या शाळेत मुख्याध्यापिका सौ. गायत्री धामणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित नृत्य आणि रिंग सादरीकरण केले. तसेच अमली पदार्थ सेवनविरोधी व कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली.
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर (शेलारवाडी): येथे ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
देहूरोड बाजार व्यापारी कमिटी:ऐतिहासिक सुभाष चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.
विविध मंडळांकडून संविधान व महापुरुषांना अभिवादन
त्रिशूल मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वाराजवळ श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धनंजय मोरे, शंकर तल्लारी, रामदास दासरी आदी उपस्थित होते. तसेच, स्वामी विवेकानंद चौक ऑटो रिक्षा प्रवासी संघटनेच्या वतीने संविधान प्रदान फलकासमोर प्राचार्य जाधव गुरुजींच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे आणि रफिक राजाभाई शेख यांच्या हस्ते संविधान सन्मान फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पात्रे यांनी केले. कार्यक्रमास गफुरभाई शेख, परशुराम दोडमणी, राजाराम अस्वरे, भरत नायडू, विजय पवार, संजय शेंडे, सुभाष चंडालिया, रिक्षाचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.































