कल्याणी गुप्ताचा ‘रसायनी’ खेळ संपला; रायगड पोलिसांची कर्जतमध्ये शिताफीने कारवाई!

सुनील पाटील (प्रेस मीडिया लाईव्ह)
कल्याणचा रस्ता धरायचा, धंदा कर्जतमध्ये शोधायचा अन् हातचा गुण दाखवायला जागा मात्र थेट रसायनीची निवडायची! चोरट्यांच्या या चलाखीला काय म्हणावे? ‘नरो वा कुंजरो वा’ या न्यायाने चोर कधी, कुठून आणि कुठे धाड टाकेल, याचा काही नियमच उरलेला नाही. रसायनीतील मोहपाडा येथील प्रसिद्ध ‘डिंपल वाईन शॉप’चे शटर रातोरात उचकटून एका महाशयांनी आपली तहान भागवली—अर्थात, वाईनच्या बाटल्यांनी नव्हे, तर गल्ल्यातील ५५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि एका सॅमसंग मोबाईलवर डल्ला मारून!
दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी रसायनी पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. १३४/२०२६, बीएनएस कलम ३०५, ३३१(४)) या ‘अज्ञात’ बहाद्दराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांच्या दप्तरी हा चोरटा सुरुवातीला ‘अज्ञात’ असला, तरी कर्माच्या वहीत त्याचा हिशोब लिहिला जातच होता.
रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) या चोरीचा समांतर तपास तातडीने हाती घेतला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि खाकी वर्दीचा दांडगा अनुभव या जोडगोळीने तपास वेगाने सुरू झाला. दरम्यान, एलसीबीचे पो.हवा. प्रतीक सावंत यांना त्यांच्या खबऱ्याकडून पक्की टीप मिळाली की, आमचे हे गुप्ताजी आता कर्जत परिसरात नवीन ‘कामगिरी’ बजावण्यासाठी येणार आहेत.
बस! बातमी मिळताच पोलिसांनी कर्जतमध्येच सापळा रचला अन् ‘रामनिवास मंजु गुप्ता’ (वय ३८, रा. रौनक सिटी, आधारवाडी, कल्याण-पश्चिम) या सराईत असामीला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. खाकी वर्दीचा ‘खास पाहुणचार’ मिळताच गुप्ताजींचे बोलके तोंड उघडले. त्यांनी केवळ रसायनीतीलच नव्हे, तर अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (गु.र.क्र. २५२/२०२५) घरफोडीचीही प्रामाणिक कबुली देऊन टाकली!
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, संदीप पाटील, सुधीर मोरे, रवी मुंडे, प्रतीक सावंत, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे, मनोहर सिरतार, प्रदीप खरात आणि सायबर शाखेचे तुषार घरत यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.
थोडक्यात काय तर, आधारवाडीतून निघालेला हा ‘कल्याणकारी’ प्रवास अखेर रायगड पोलिसांच्या कोठडीत सुखरूप विसावला आहे!
Views: 31





























