देहूरोड येथे श्रीमती नारायणीदेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
देहूरोड: चंद्रशेखर पात्रे :
श्रीमती नारायणीदेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संविधान फलकास पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंध्र प्रदेशातून आलेले प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना देण्यात आली.
**वीर शहीदांचे स्मरण हेच खरे स्वातंत्र्य : गफुरभाई शेख**
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अल्पसंख्याक सेलचे मावळ तालुका अध्यक्ष गफुरभाई शेख म्हणाले, “अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या क्रांतिवीरांना व शहीदांना अभिवादन करून स्वातंत्र्यदिन साजरा करणे अभिमानास्पद आहे.” तसेच, सर्व धर्मियांना सोबत घेऊन सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ईश्वर अगरवाल यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
**ध्वजारोहणाचा मान मिळणे हे माझे भाग्य : रवींद्र राव**
सन्मानाला उत्तर देताना प्रमुख अतिथी रवींद्र राव म्हणाले, “भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, झाशीची राणी, लाला लजपतराय अशा अनेक वीरांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. केवळ भेटीसाठी आलो असताना ट्रस्टने माझ्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देऊन माझा जो सन्मान केला, हे मी माझे भाग्य समजतो.”
यावेळी आरपीआय नेते श्रीमंत शिवशरण व संजय पिंजण यांनीही आपले विचार मांडले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल व उपाध्यक्षा अनिता अगरवाल यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे रवींद्र राव आणि अध्यक्ष गफुरभाई शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या स्वागतपर भाषणात अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत भावी पिढीने देशाच्या स्वातंत्र्याचे मोल जपून देशहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
**मान्यवरांची उपस्थिती**
या प्रसंगी कांतीशेठ पारेख, इंद्रपालसिंग रत्तू, अरुण जगताप, रफिक शेख, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, चंद्रशेखर पात्रे, राजू पंडित, सुनील गायकवाड, विशाल गायकवाड, रंगन्ना राजले, शशीकांत सप्पागुरू, रमेश जाधव, पोपटराव कुरणे, महेश गायकवाड, अरविंद गायकवाड, मोजेस दास आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पू शिवशरण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चंद्रशेखर पात्रे यांनी मानले.





























