जुन्या भांडणातून वराळे येथे तरुणाची निर्घृण हत्या; ६ जण पोलिसांच्या ताब्यात


जुन्या भांडणातून वराळे येथे तरुणाची निर्घृण हत्या; ६ जण पोलिसांच्या ताब्यात

वडगाव मावळ : चंद्रशेखर पात्रे :

मावळ तालुक्यातील वराळे येथील शिक्षक कॉलनी परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून आणि डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन विधिसंघर्षीत बालकांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

**नेमकी काय घडली घटना?**

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (३० ऑगस्ट) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयत प्रशांत शिंगाडे हा आपल्या मित्रासोबत वराळे येथील शिक्षक कॉलनीमधील ‘एस. डी. फोटो स्टुडिओ’जवळ चहा पिण्यासाठी थांबला होता. या दरम्यान, जुन्या वादाची किनार धरून आरोपींनी प्रशांतवर अचानक हल्ला चढवला.

सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत आरोपींनी प्रशांतच्या डोक्यावर, हातावर, छातीवर आणि पाठीवर धारदार कोयत्याने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली, ज्यामध्ये प्रशांतचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

**आठ जणांवर गुन्हा; दोन अल्पवयीन बालकांसह ६ जण ताब्यात**

या प्रकरणी मयत प्रशांतचे वडील सुभाष विष्णू शिंगाडे (वय ५०, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिल समुखराव (वय १८), सुनील समुखराव (वय २४), यश लोखंडे (वय १९), प्रतीक तातळे (वय २८), हेमराज सोनवणे (वय २८), रोहन सावंत (वय १९), रुद्र कांबळे (वय १७) आणि रोशन साव (वय १७, सर्व रा. समता कॉलनी, वराळे) या आठ जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपींपैकी सहा जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!