परमिट खिशात नाही अन् रिक्षा सुसाट?’: इचलकरंजी RTO चा ७३ रिक्षाधारकांना ५ ते २० हजारांचा ‘कायदेशीर’ दणका!
गजानन शिरगावे :
इचलकरंजीच्या रस्त्यांवर ऑटो रिक्षा चालवणं म्हणजे केवळ स्टिअरिंग धरणं नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत राहून गिरकी घेणं असतं, याचा विसर बहुधा आपल्या ७३ रिक्षाधारक बांधवांना पडलेला दिसतो!

मोटार वाहन कायदा, १९८८ नावाचा एक अवाढव्य ग्रंथ या देशात अस्तित्वात आहे आणि त्याच्या ‘कलम ६६’ नावाच्या अध्यायात परवाना (Permit) असल्याशिवाय गाडी रस्त्यावर उतरवू नये असे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. अनेक महाभागांनी परमिट मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली, हाती परवानगी क्रमांकही आला; पण पुढे लागणारे शुल्क भरून ‘वैध परमिट’ खिशात टाकण्याचे सौजन्य मात्र दाखवले नाही. कागद अर्धवट अन् रिक्षा सुसाट, असा हा काहीसा प्रकार घडला आहे.
आता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री श्रीकृष्ण नकाते साहेबांनी प्रशासकीय मेख मारली असून, अशा तब्बल ७३ परमिट-मुक्त रिक्षाधारकांच्या हाती दणदणीत नोटिसा टेकवल्या आहेत.
ज्यांच्या हातात ही नोटीस पडली आहे, त्यांनी जरा ‘कलम १९२-अ’ चा महिमा समजून घेतलेला बरा. परमिटशिवाय ऑटो धावली, तर पहिल्या चुकीला ५,००० ते १०,००० रुपयांचा दणका बसेल, तर दुसऱ्यांदा तीच हौस केली तर १०,००० ते थेट २०,००० रुपयांची सडेतोड मार सहन करावी लागेल.
त्यामुळे १० दिवसांच्या आत इचलकरंजी RTO कार्यालयात या, थकलेले शुल्क भरा आणि सन्मानाने परमिट हाती घ्या, असा अत्यंत अगत्याचा, पण तितकाच थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.
व्यापार परवान्याचा असो वा रिक्षाचा—नियमांना बगल देऊन मारलेली उडी शेवटी खिशालाच भगदाड पाडते. तेव्हा इचलकरंजीतील रिक्षाचालक मित्रांनी वेळीच जागे व्हावे आणि पावती फाटण्याआधी परमिट पदरात पाडून घ्यावे, हेच सुज्ञांचे लक्षण!



























