इचलकरंजीत नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण, पालिकेकडून मात्र जमिनीत पाण्याचा ‘अभिषेक’!
इचलकरंजीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सध्या एक अत्यंत स्पृहणीय आणि थक्क करणारा चमत्कार पाहायला मिळत आहे. रस्ता उकरताना महापालिकेच्या अत्यंत तत्पर आणि कार्यक्षम प्रशासनाचा एक ‘अद्भुत’ पराक्रम उजेडात आला असून, आपल्या लाडक्या नागरिकांची जमीन तहानलेली राहू नये म्हणून हजारो लिटर पाणी थेट जमिनीतच पाजण्याचा उदात्त उपक्रम येथे यशस्वीरीत्या राबवला जात आहे!
सुमारे १२ एचपीच्या धिप्पाड मोटारीद्वारे सलग १२ तास अखंड चाललेला हा ‘जलोत्सव’ पाहिला, की पालिकेच्या औदार्याची कमाल वाटते. चार-साडेचार लाख लिटर पाणी तर अवघ्या अर्ध्या दिवसात जमिनीत लीलया फुकट जिरवण्यात आले! पण हा पाण्याचा दानधर्म आजचाच आहे की गेले कित्येक महिने हा ‘गुप्त भूगर्भीय पाणीपुरवठा’ सुरू होता, हा संशोधनाचा विषय आहे.
नागरिकांना नळाला पुरेसे पाणी मिळाले नाही तरी चालेल, पण बिचाऱ्या जमिनीची तहान भागली पाहिजे, या उदात्त हेतूनेच गुरु टाकीच्या पाईपलाईनला ही गुपचूप ‘गळतीची संजीवनी’ दिली असावी! शहरात नागरिक पाण्यासाठी हंडाभर भटकत असताना, पालिकेची यंत्रणा मात्र अथांग पाणी जमिनीत सोडून ‘वॉटर ऑडिट’च्या संकल्पनेला कशी हरताळ फासते, हे पाहणे खरोखरच कौतुकास्पद आहे.
गळती नेमकी कधीपासून सुरू होती आणि यामुळे आजवर किती लाखांचा ‘धर्मादाय’ झाला, याची सखोल चौकशी व्हावी अशी वेडगळ मागणी आता संतप्त नागरिक करत आहेत. परंतु, “झाकली मूठ सव्वा लाखाची” या न्यायाने महापालिका प्रशासन या अथांग गळतीवर नेहमीप्रमाणे मौनाचे पाट वाहू देईल, यात शंका नाही!
Views: 50































