खादीची ‘खा’ आणि लोकशाहीची ‘आदी’ ओळख..!


खादीची ‘खा’ आणि लोकशाहीची ‘आदी’ ओळख..!

आजकाल समाजात दोन गोष्टी फार वेगाने वाढताना दिसतात — एक म्हणजे खादी घालण्याची फॅशन आणि दुसरी म्हणजे लोकशाहीवर लांबच लांब भाषण देण्याची सवय! पूर्वी खादी म्हणजे साधेपणा आणि स्वावलंबनाची ओळख होती. पण आता काही मंडळींसाठी खादी म्हणजे केवळ एक “फोटो काढण्याचा ड्रेस कोड” झाला आहे. वाचकांनी इथे एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवून घ्यावी की, या लेखाचा आणि खादीचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही; आपण इथे फक्त माणसाचा ‘स्वभाव’ आणि ‘स्वदेशी’ यावर भाष्य करत आहोत!

अहो, गावात एखादा कार्यक्रम असो वा समाजसेवेचा अचानक आलेला झटका — कपाटातून खादीचा कुर्ता बाहेर येतो आणि चेहऱ्यावर “जनतेचा सेवक” हा भाव आपोआप प्रकट होतो! खादी घातली की काही लोकांच्या चालण्यातही असा काही बदल होतो की विचारू नका. कालपर्यंत चहाच्या टपरीवर ओरडून “दोन कटिंग” म्हणणारे आमचे मित्र, आज खादीचा सदरा अंगात चढवला की अचानक “जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा” करताना दिसतात.

आमच्या ओळखीच्या एका काकांनी तर कमालच केली! घरातल्या कोणाचंही ते ऐकत नाहीत, पण बाहेर कट्ट्यावर मात्र लोकशाही वाचवण्यावर तासभर व्याख्यान देतात. त्यांच्या बायकोचं बिचारीचं म्हणणं एकच — “अहो, घरात आधी लोकशाही लागू करा, मग देश वाचवा!” पण काका आपले देशाच्या काळजीत मग्न!

काही जण खादी एवढ्या अभिमानाने घालतात की जणू स्वातंत्र्यलढ्यातून थेट आताच घरी परत आले आहेत. पण त्यांना जर चुकून विचारलं, “गांधीजींचे कोणतेही तीन विचार सांगा,” तर लगेच मोबाईलची रिंग वाजल्याचं नाटक करून विषय बदलला जातो! लोकशाहीचंही तसंच झालंय. फेसबुकवर मोठमोठे स्टेटस, व्हॉट्सअ‍ॅपवर लांबलचक मेसेज आणि प्रत्यक्षात मात्र शेजाऱ्याचं मत ऐकायलाही तयारी नसते.

बाकी काहीही असो… आजकाल खादीपेक्षा तिच्यावरचे फोटो जास्त इस्त्री केलेले दिसतात, आणि लोकशाहीपेक्षा तिच्यावरच्या चर्चा जास्त गरम असतात!

संविधानाने आपल्याला अधिकार दिले, पण कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम ही खादीची ‘टोचणी’ करते. नवीन खादीचा सदरा अंगात शिरला की तो तुम्हाला असे काही ‘चिमटे’ काढतो की विचारू नका! लोक म्हणतात, “खादी टोचते.” मी म्हणतो, “अरे, ती टोचते म्हणूनच तर तुम्हाला कळतं की तुमची जाणीव अजून जिवंत आहे!” जोपर्यंत अंगाला खाज सुटतेय, तोपर्यंत समजायचं की तुमचं माणूसपण शाबूत आहे.

म्हणूनच आजची नवी ओळख अशी — “खादीची ‘खा’ म्हणजे खाण्याची नव्हे, तर साधेपणाची आठवण… आणि लोकशाहीची ‘आदी’ म्हणजे फक्त सवय नव्हे, तर जबाबदारीची जाणीव!”

तर मंडळी, खादी वापरा..! ती टोचली तर ओरडू नका, ती खाजवली तर तक्रार करू नका. ती खाज म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख आहे. सदरा खादीचा असावा आणि नियत मात्र ‘स्वच्छ’ असावी. खादीच्या सुरकुत्यांत तुमचं चारित्र्य असं काही अडकेल की जगातील कोणतीही ‘इस्त्री’ त्याला पुन्हा सरळ करू शकणार नाही!

खादीची खाज सोसा, पण माणुसकीची लाज घालवू नका

वाचक मित्रांनो हा लेख आपणास कसा वाटला हे नक्की कळवा..


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!