विशाल खंडेलवाल यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

देहूरोड : शहरातील शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अत्यंत निष्ठावान शिपाई, ज्येष्ठ सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते बसवराज सायबन्ना कोरे (वय ६०) यांचे दि. १७ मार्च रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १८ मार्च रोजी देहूरोड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कोरे परिवारासोबतच खंडेलवाल कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते विनोद कोरे यांचे थोरले बंधू होत.
‘आमच्या कुटुंबाचा आधारवड हरपला’ – विशाल खंडेलवाल
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक विशाल खंडेलवाल यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माझ्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या व्यवसायात बसवराज कोरे यांचे योगदान शब्दातीत आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी आमच्या कुटुंबाला प्रेम आणि जिव्हाळा दिला. व्यवसायाचा कारभार पाहताना त्यांनी नेहमी प्रामाणिकपणा जपला. त्यांच्या जाण्याने कोरे कुटुंबाप्रमाणेच खंडेलवाल कुटुंबाचीही कधीही न भरून निघणारी वैयक्तिक हानी झाली आहे.”
निष्ठावान नेतृत्वाचा अंत
श्रद्धांजली प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे म्हणाले की, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा एक प्रामाणिक नेता आज आपण गमावला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी उपशहरप्रमुख पदापर्यंत मजल मारली, पण पक्षनिष्ठा कधीही ढळू दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. कृष्णा दाभोळे यांनीही कोरे यांच्या एकनिष्ठेचा गौरव केला. “आजकाल लोक छोट्या कारणावरून पक्ष बदलतात, मात्र बसवराज कोरे अखेरपर्यंत आपल्या विचारांशी ठाम राहिले,” असे ते म्हणाले.
शिवसेना समन्वयक रमेश जाधव यांनीही कोरे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिवसेनेच्या स्थापनेपासून कितीही वादळे आली तरी ते डगमगले नाहीत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांशी त्यांचे सुमधुर संबंध होते.
विद्युत दाहिनीचा लाभ घेण्याचे आवाहन
याप्रसंगी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. देहूरोड वैकुंठ स्मशानभूमीतील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली मोफत विद्युत दाहिनी आता कार्यान्वित झाली आहे. देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्ड व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे किंवा पिंपरी-चिंचवड परिसरातील कोणत्याही रुग्णालयात मृत्यू झाल्यास, रुग्णालयाचा दाखला देऊन नागरिक या मोफत सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अंत्यसंस्कारासाठी देहूरोड शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























