परदेश दौऱ्यात मोदी व्यस्त, इकडे जनता महागाईने त्रस्त!’; हुकूमशाही इंधनवाढी विरोधात पुणे महिला काँग्रेस पेटून उठली !


परदेश दौऱ्यात मोदी व्यस्त, इकडे जनता महागाईने त्रस्त!’; हुकूमशाही इंधनवाढी विरोधात पुणे महिला काँग्रेस पेटून उठली !

पुणे : “पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवून सामान्यांच्या खिशाला रोज ‘सूडाचा विस्तव’ लावणाऱ्या दिल्लीतल्या नाकर्त्या सरकारने आता सत्तेच्या खुर्च्या खाली कराव्यात. जनतेचे जगणे मुश्कील करून हे साहेब जर खुर्चीला चिकटून राहणार असतील, तर पुणेरी स्टाईलने ही खुर्ची कशी खेचायची, हे महिला आता दाखवून देतील,” असा थेट आणि मर्मभेदी इशारा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी दिला.

इंधन आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या ‘रॉकेट’ गतीने होणाऱ्या दरवाढीचा पंचनामा करण्यासाठी आज पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने कॅंपमधील कांचन सर्व्हिस पेट्रोल पंपाबाहेर जोरदार ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी आणि स्वाती शिंदे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या अजब गजब धोरणांचे वाभाडे काढले.

खास पुणेरी टोमणा !

“दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र, अन् महागाईमुळे जनतेला होऊ लागला आहे भगेंद्र…”

इंधन आणि गॅस दरवाढीच्या तीव्र झळा सोसणाऱ्या त्रस्त जनतेची आजची नेमकी अवस्था काय आहे, हेच या अत्यंत चपखल, धारदार आणि पुणेरी शैलीतील उपरोधिक घोषणेने आजच्या आंदोलनात अधोरेखित केले.

‘भाजपची इंधन उधळपट्टी आणि जनतेची दिवाळखोरी!’

मोदी सरकारच्या निवडणूक मॅन्युफॅक्चरिंगवर कडाडून टीका करताना स्वाती शिंदे म्हणाल्या, “पाच राज्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने स्वतःच्या मोटारींतून हजारो लिटर इंधनाची आणि पैशांची अशी काही वारेमाप उधळपट्टी केली, जणू काही पेट्रोलचे विहिरी यांच्याच अंगणात आहेत! आपले प्रधानसेवक तर प्रचारासाठी विमानातूनच खाली उतरायला तयार नव्हते. ‘इंधनवाढ होऊ देणार नाही’ हे निवडणुकीपुरते गोड गाणे ऐकवून जनतेची दिशाभूल केली गेली. आता निवडणुका संपल्या, भाजपचे उधळपट्टीचे कार्यक्रम आटोपले आणि मते पदरात पडताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून साहेब परदेश दौऱ्यावर ‘हवा पालट’ करायला निघून गेले आहेत! हा जनतेचा उघड उघड विश्वासघात आहे.”

विदेशी गुंतवणूक की सुळसुळाट? : प्रिया वंदनाजी

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याची फिरकी घेताना राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी म्हणाल्या, “पंतप्रधान आणि त्यांचे लाडके मुख्यमंत्री परदेशात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे ‘कागदी’ करार करत आहेत. इकडे देशात मात्र गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी रुपये गुंडाळून पळ काढला आहे! घरात नाही दाणा आणि मला परदेश दौऱ्याला न्या, अशी अवस्था झाली आहे. हे भयंकर आर्थिक संकट लपवून मोदीजी पाच देशांच्या सफरीवर गेले आहेत. हे संकट कसे निस्तरणार, याचे उत्तर त्यांनी संसदेत द्यावे की तिथेही फक्त टाळ्या आणि थाळ्याच वाजवायच्या आहेत?”

‘लोकांसांगे ब्रह्मज्ञान…’ घोषणांनी परिसर दणाणला

‘ट्रंप बोले, मोदी डोले’, ‘परदेश दौऱ्यात मोदी व्यस्त, जनता त्रस्त’ आणि ‘लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ अशा अत्यंत चपखल आणि उपरोधिक टोमणे मारणाऱ्या घोषणांनी यावेळी कॅंप परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात रिकामे गॅस सिलिंडर आणि फलक हाती घेऊन महिलांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

या आंदोलनात अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, प्राजक्ता जाधव, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, रेखा जैन, नसीम शेख, जया गोयल, मीना शेंडगे यांच्यासह महिला काँग्रेसच्या अनेक रणरागिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. “जर हे सुलतानी दर तातडीने कमी झाले नाहीत, तर काँग्रेस महिलांचा हा झाशीच्या राणीचा अवतार सरकारला महागात पडेल,” असा सज्जड दम शेवटी देण्यात आला.

#pressmedialive #FuelPriceHike #Inflation #PuneCongress #MahilaCongress #SwatiShinde #ModiGovt #FuelLoot #PuneAgitation #PetrolDieselPrice #GoBackModi #MehangaiMuktBharat


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!