‘जिवंत बॉम्ब’ की सात लाखांचा जुगाड.? पुण्यातल्या अजब खंडणीबहाद्दरचा ‘करेक्ट कार्यक्रम’ !
पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयासमोर थेट ‘जिवंत बॉम्ब’ ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. ‘पुण्यावर दहशतवादी हल्ला होणार की काय?’ या भीतीने अवघी यंत्रणा दोन दिवस डोळ्यात तेल घालून काम करत होती. मात्र, पुणे पोलिसांनी आणि एटीएसने दाखवलेल्या कमालीच्या चपळाईमुळे या संपूर्ण ‘बॉम्बनाट्याचा’ सूत्रधार आता गजाआड झाला असून, त्यामागचे जे सत्य समोर आले आहे ते ऐकून डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे!
दहशतवादाचा आव आणणारा हा कोणताही आंतरराष्ट्रीय कट नव्हता, तर तो होता एका सोलापूरच्या पठ्ठ्याचा अजब उद्योग! आरोपी शिवाजी रोकडे (राठोड) याला संबंधित रुग्णालयाने उपचारासाठी सुमारे सात लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. आता एवढी मोठी रक्कम आणायची कुठून? या विवंचनेतून त्याने थेट डॉक्टरलाच ‘डोस’ देण्याचे ठरवले. डॉक्टरकडूनच मोठी खंडणी उकळायची, या सुपीक डोक्यातून त्याने रुग्णालयासमोर बॉम्बसदृश वस्तू ठेवून दिली. स्वतःच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा हा अजब प्रकार होता.
हडपसर परिसरातील या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ती संशयास्पद वस्तू छोट्या स्फोटासह निकामी केली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्हीचे जाळे तपासले असता आरोपीचा माग लागला. पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या घरावर छापा टाकला, तेव्हा तिथे त्या ‘बॉम्ब’ वस्तूला जोडलेल्या डिजिटल घड्याळाचे रिकामे पाकीट आढळून आले. या एका पुराव्याने पोलिसांचा संशय अधिक बळकट केला.
स्वतःला हुशार समजणारा हा आरोपी गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याने पोलिसांनी हुलकावणी देत दोन वेळा चकवा दिला आणि हावडा एक्सप्रेस पकडून तो पळ काढत होता. पण, आधुनिक काळातील ‘डिजिटल इंडिया’ त्याला नडली! पळत असताना काही दुकानांमध्ये त्याने ‘युपीआय’द्वारे (UPI) पैशांचे व्यवहार केले होते. डिजिटल व्यवहाराच्या याच धाग्यावरून पोलिसांना त्याचा अचूक मोबाईल नंबर मिळाला.
मोबाईल लोकेशन ट्रॅक करत पुणे आणि नागपूर एटीएसच्या पथकाने संयुक्त सापळा रचला. ही ट्रेन जेव्हा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली, तेव्हा पोलिसांनी डब्यात घुसून आरोपी शिवाजीला बेड्या ठोकल्या.
एका रुग्णाचा सात लाखांचा खर्च वाचवण्याचा हा अघोरी प्रयत्न अखेर फसला असून, संपूर्ण पोलीस दलाला दावणीला लावणाऱ्या या महाभागाची रवानगी आता थेट पोलीस कोठडीत झाली आहे. ‘पुण्याचे पोलीस’ शेवटी पुण्याचेच, त्यांनी गुन्हेगाराचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केलाच!
#PuneNews #CrimeNews #PunePolice #BreakingNews #Hadpapsar #DigitalIndia #PuneCrime #MaharashtraNews #PressMediaLive


























