‘चला मास्तर, शाळेत चला !’: शिक्षण संचालकांचे प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना ‘प्रेमाचे’ फर्मान..!

आम्ही लहानपणी ऐकलं होतं की, शिक्षकाचं मुख्य काम विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणं हे असतं. पण आधुनिक काळात शिक्षण खात्याने आणि सरकारने गुरूजींना इतकं ‘सर्वव्यापी’ बनवलंय, की शाळा सोडून जगातली सगळी महत्त्वाची कामं शिक्षकच करू लागलेत! मग ती निवडणुकीची मतमोजणी असो, जनगणनेची आकडेमोड असो, की एखाद्या सरकारी बाबूच्या टेबलवरच्या फायलींना सुवासिक अत्तर लावणं असो!
गेल्या अनेक महिन्यांपासून आपले शेकडो ज्ञानोबा माउली स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणूक शाखा आणि इतर सरकारी कार्यालयांच्या वातानुकूलित दालनांत प्रतिनियुक्तीचे ‘बदाम-पिस्ते’ खात बसले होते. इकडे मूळ शाळेत मात्र, ‘गुरूजी कधी येणार?’ या आशेने लेकरं फळ्याकडे बघून डोळे ताणत होती. या प्रतिनियुक्तीमुळे शाळांमधील शैक्षणिक कामकाजाचा पुरता बट्ट्याबोळ झाला असल्याच्या तक्रारी जेव्हा पालकांकडून येऊ लागल्या, तेव्हा कुठे अखेर शिक्षण विभागाला जाग आली!
९ मे रोजी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत सरकारला अचानक हा साक्षात्कार झाला आणि त्यांनी ‘’ गुरूजींना थेट धोक्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी मिळून एक संयुक्त परिपत्रक काढलं असून, सर्व प्रतिनियुक्ती तातडीने रद्द केल्या आहेत.
या परिपत्रकाचा सरळ आणि सोपा अर्थ असा की—”गुरूजी, आपला मुक्काम हलवा आणि आपापल्या मूळ शाळेत हजर व्हा!” जे शिक्षक या आदेशानंतरही ‘आम्ही सरकारी कार्यालयाचेच जावई’ म्हणून तिथेच ठाण मांडून बसतील, त्यांचा मे महिन्याचा पगार रोखण्याचा ‘कडू डोस’ शिक्षण खात्याने तयार ठेवला आहे. म्हणजेच, पगार हवा असेल तर निवडणुकीच्या फायली बाजूला ठेवून हातात पुन्हा खडू धरावाच लागेल.
विशेष म्हणजे, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकार्यांना केवळ शिक्षण विभागाच्या माहितीतीलच नव्हे, तर इतर शासकीय कार्यालयांत ‘आसनस्थ’ झालेल्या शिक्षकांचाही शोध घेण्यास सांगितले आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून, त्यांना कायद्याचा बडगा दाखवून आपल्या शिक्षकांना तिथून सोडवून आणण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण ‘घरवापसी’ मोहिमेचा एकत्रित अहवाल ३१ मे पर्यंत थेट मंत्रालयात सादर करायचा आहे.
सरकारी कार्यालयात बसून कागद काळे करण्यात जी धन्यता मानली जात होती, ती आता संपली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपता संपता गुरूजींना आता खऱ्या अर्थाने ‘शाळा’ शिकायला मिळणार आहे. चला, उशिरा का होईना, सरकारला समजलं की शिक्षकांचं खरं स्थान ‘तहसीलदार कचेरीत’ नसून ‘वर्गाच्या खोलीत’ असतं! आता बघूया, किती गुरूजी या मे महिन्यात पगार वाचवण्यासाठी आपल्या मूळ गादीवर परत येतात ते!
👉 ताज्या आणि सविस्तर अपडेट्ससाठी फॉलो करा : [Press Media Live]
#शिक्षकांचीघरवापसी #चलामास्तरशाळेतचला #शिक्षणविभाग #प्रतिनियुक्तीरद्द #प्रेसमीडियालाईव्ह































