हज यात्रेकरूंची लाखो रुपयांची झाली ‘लूट’; संशयित आरोपी अमीर शेख कुटुंबासह फरार ”! 


हज यात्रेकरूंची लाखो रुपयांची झाली ‘लूट’; संशयित आरोपी अमीर शेख कुटुंबासह फरार ”!

कोंढवा  : माणसाच्या आयुष्यातील पवित्र भावना आणि देवाघरची ओढ यांचाही बाजार मांडायला निघालेल्या नराधमांना काय म्हणावे? आपल्या संपूर्ण आयुष्याची पुंजी देवाच्या चरणी अर्पण करून, आयुष्यात एकदा तरी त्या पवित्र मक्केचे दर्शन घडावे, या उदात्त हेतूने कोंढव्यातील शेकडो गरिबांनी पै-पै साठवला होता. पण याच निष्पाप भावनेचा आणि विश्वासाचा एका भामट्याने जाहीर लिलाव मांडला आहे. हज यात्रेच्या नावाखाली गरिबांना लुबाडणारी एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना कोंढवा परिसरात उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हज यात्रेचा पवित्र प्रवास घडवण्याचे खोटे आमिष दाखवून, शेकडो भाविकांकडून श्रद्धेच्या नावावर लाखो रुपये उकळणारा संशयित आरोपी अमीर शेख हा इसम सध्या आपल्या कुटुंबासह पोबारा करून फरार झाला आहे. गरिबांनी पोटाला चिमटा काढून, पोराबाळांच्या तोंडचा घास काढून आणि रक्ताचे पाणी करून साठवलेला कष्टाचा पैसा असा एका रात्रीत गायब व्हावा? हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर त्या निष्पाप कुटुंबांच्या काळजावर केलेला मर्मभेदी आघात आहे! ज्या पैशांनी मक्केची पावन वारी घडणार होती, त्याच पैशांवर डल्ला मारून या भामट्याने अनेकांच्या घरात अंधार केला आहे. श्रद्धेच्या बाजारात अशा चोरांचा सुळसुळाट व्हावा, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?

पोलिसांची संथ भूमिका आणि जनतेचा वाढता संताप

या धक्कादायक प्रकरणाची वाच्यता झाल्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात सध्या केवळ ‘अदखलपात्र’ गुन्ह्याची नोंद झाली असल्याचे समजते. गुन्हा तांत्रिकदृष्ट्या अदखलपात्र असला तरी त्या गरीब भाविकांचे दुःख आणि संताप मात्र ‘अति-दखलपात्र’ आहे, याचे भान प्रशासनाला कधी येणार? लोक हवालदिल झाले आहेत आणि पोलीस मात्र कागदी घोड्या नाचवत आहेत. या अन्यायाविरुद्ध आणि आपल्या हक्काच्या पैशांसाठी येत्या १७ तारखेला शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणार आहेत. पुढील काळात फसवणुकीचे आणखी अनेक बळी समोर यण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अंधश्रद्धेच्या बाजारात लुटारूंचे उखळ पांढरे

अशा भामट्यांच्या जाळ्यात आपले निष्पाप नागरिक वारंवार का फसतात, हा आता आत्मपरीक्षणाचा विषय बनला आहे. भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे थांबवले पाहिजे. कोणत्याही धार्मिक किंवा प्रवासी योजनांमध्ये कष्टाचा पैसा गुंतवण्यापूर्वी संबंधित संस्थेची नोंदणी, त्यांचे परवाने आणि अधिकृत कागदपत्रांची शहानिशा का केली जात नाही?

प्रशासनाने आता कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे! पोलिसांनी तात्काळ आपली चक्रे फिरवून त्या संशयित अमीर शेखला जगाच्या पाठीवरून कुठूनही खेचून आणले पाहिजे. त्याला कायद्याचा असा काही कडक दणका द्यावा की भविष्यात कोणाच्याही श्रद्धेशी खेळण्याची कोणाची हिंमत होणार नाही. त्या पीडित आणि हवालदिल भाविकांना त्यांचा घामाचा पैसा परत मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, हाच कोंढवावासीयांचा संतप्त इशारा आहे!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!