आईच्या आठवणींनी डोळे ओलावले अन् फडतारे परिवाराच्या उपक्रमाने घोसरवाडचे ‘आरोग्य’ सुखावले !

घोसरवाड : सध्याच्या कलयुगात माणसाने देवाकडे काय मागावे, तर दोनच गोष्टी—एक म्हणजे खिसा गरम राहू दे आणि दुसरं म्हणजे शरीर निरोगी राहू दे ! खिसा गरम ठेवण्याची खात्री सरकार देत नाही, पण घोसरवाड येथील फडतारे परिवाराने गावकऱ्यांचे शरीर मात्र नक्कीच निरोगी ठेवण्याचा विडा उचलला. स्वर्गीय श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या पवित्र स्मरणार्थ आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात तब्बल दोनशें रुग्णांनी आपापली दुःखे डॉक्टरांच्या पदरात टाकली. ‘मोफत’ हा शब्द ऐकल्यावर जनतेची पावले किती उत्साहाने धावतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला! गावकऱ्यांनी या शिबिराला असा काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, की आजार कमी आणि गर्दीच जास्त अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती.
शिबिराचे उद्घाटन सरपंच साहेबराव सावळे यांच्या हस्ते आणि उपसरपंच रेश्मा बिराजदार यांच्या उपस्थितीत अगदी थाटात पार पडले. नेत्यांना उद्घाटनाला बोलावले की गर्दी हमखास जमते, हा नियम येथेही लागू झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या ‘अस्त्र-शस्त्रांचा’ खेळ सुरू झाला. जनरल सर्जन डॉ. राजीव बाबराव जाधव यांनी गावकऱ्यांच्या पोटातील गुपिते म्हणजेच आजार शोधून काढली. पोटात नक्की काय गडबड चालली आहे हे ओळखण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.
दुसरीकडे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. स्वप्नील निमळे यांनी अनेकांच्या कानांचे पडदे तपासले. काहींचे कान ‘नेतेमंडळींची भाषणे ऐकून’ बधीर झाले होते, तर काहींचे घसे ‘उन्हाळ्यात थंड पाणी’ पिऊन बसले होते, डॉक्टरांनी प्रत्येकाला अगदी योग्य मात्रा दिली. इचलकरंजी मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अर्जुन घट्टे यांनी रुग्णांना केवळ तपासले नाही, तर आरोग्याचा सुप्रसिद्ध डोसही पाजला. या सगळ्यात डॉ. भूषणकुमार घमटे यांनी योगासनांची अशी काही प्रात्याक्षिके करून दाखवली, की ‘हात वर करा आणि पाय मागे घ्या’ म्हणताना काहींची हाडे कडाकडा वाजली! पण आरोग्याचा हाच खरा मार्ग आहे, हे त्यांनी गावकऱ्यांच्या गळी उतरवले.
दिवसभर शरीराची काळजी घेतल्यानंतर रात्री मात्र आत्म्याच्या समाधानाचा कार्यक्रम झाला. जानकी वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. म्हातारपणात पोटाला अन्न आणि मनाला आदर मिळाला की वृद्धांचे चेहरे कसे खुलतात, हे तिथे पाहायला मिळाले. त्या माउलींनी आयोजकांना दिलेले आशीर्वाद कोणत्याही औषधापेक्षा मोठे होते. त्यानंतर कार्यक्रमाची खरी रंगत वाढवली ती प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. उत्तम पाटील महाराज यांनी! त्यांनी ‘आई’ या विषयावर असे काही कीर्तन रंगात आणले, की उपस्थितांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. महाराजांनी आईचे महत्त्व सांगताना समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले. त्यात पुन्हा गावच्या जयभवानी, वाकनाथ, श्री सिद्धेश्वर आणि महेश भजनी मंडळांनी भजनाचा असा काही सूर धरला, की टाळांच्या गजरात घोसरवाड दुमदुमून गेले.
सध्याच्या काळात जिथे डॉक्टर नाडी तपासण्याचेही पैसे घेतात, तिथे फडतारे परिवाराने पूर्ण गाव तपासून मोफत औषधे दिली, हे समाज परिवर्तनाचे आणि बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. या संपूर्ण आरोग्य यज्ञाला यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच बाबासाहेब पुजारी, सुनील लगड, वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब कोकणे, अभय बारवाडे, भूपाल नाईक, शशिकांत बिंदे, शिवाजी मोरे यांच्यासह पत्रकार मित्र संजय सुतार आणि दिलीप कोळी यांनीही विशेष परिश्रम घेतले. एकूणच काय, तर घोसरवाडकरांनी आजार पळवून लावला आणि आरोग्याचा सुकाणू हाती घेतला, हे मात्र नक्की!
Press Media Live साठी घोसरवाड येथून विशेष वृत्त.




























