लोहगड मर्डर मिस्ट्री: खाकी दाखवताच ‘ती’ पोपटासारखी बोलली! सेल्फीचा बनाव रचून होणाऱ्या पतीचा काटा काढणारी ‘कली’ गजाआड


लोहगड मर्डर मिस्ट्री: खाकी दाखवताच ‘ती’ पोपटासारखी बोलली! सेल्फीचा बनाव रचून होणाऱ्या पतीचा काटा काढणारी ‘कली’ गजाआड!

वडगाव मावळ (विशेष प्रतिनिधी, चंद्रशेखर पात्रे):

दोन मोठ्या उद्योगपती आणि व्यावसायिक कुटुंबांमधील कोट्यवधी रुपयांचा शाही विवाह संपन्न होणार होता. मात्र, लग्नापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्राला थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची बातमी सुरुवातीला आली होती. परंतु, आता या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक आणि नवीन कलाटणी मिळाली आहे. केतन अग्रवालचा पाय घसरून मृत्यू झाला नसून, त्याचा पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या हायप्रोफाइल मर्डर मिस्ट्रीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण उद्योग जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृतक केतन अग्रवाल आणि आरोपी सिया गोयल या दोघांचा विवाह जयपूर येथील एका मोठ्या आलिशान पॅलेसमध्ये अत्यंत थाटामाटात होणार होता. वऱ्हाडी आणि पाहुण्यांच्या प्रवासासाठी चक्क दोन विमाने देखील बुक करण्यात आली होती. परंतु, सिया गोयल हिला केतन अग्रवालशी लग्न करायचे नव्हते; तिच्या मनात चेतन चौधरी हा वसलेला होता. घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्नाला होकार तर दिला, मात्र केतन अग्रवालचा कायमचा काटा काढायचा कट तिच्या डोक्यात शिजत होता.

आपल्या प्रियकराच्या साहाय्याने कट रचून सिया गोयल हिने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी बोलावून घेतले. तेथे तिचा प्रेमी चेतन चौधरी हा आधीच पोहोचला होता. गडावरील एका धोकादायक खोल कड्यावर केतनला उभे करून त्याला सेल्फी काढण्यास सांगण्यात आले. केतन फोटो काढण्यात व्यस्त असताना, सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने त्याला थेट खोल दरीत ढकलून दिले. कृत्य केल्यानंतर दोघांनी तिथे आरडाओरडा करत सुरक्षा रक्षकांना बोलावले आणि केतनचा सेल्फी काढताना पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव रचला. सुरुवातीला पोलिसांनी देखील या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

केतनच्या मृत्यूनंतर अग्रवाल यांच्या घरी सांत्वनासाठी सिया गोयल आली होती. त्यावेळी केतनच्या बहिणीने सियाला बाजूला घेऊन या घटनेबाबत विचारपूस केली. मात्र, सियाकडून अत्यंत उलटसुलट आणि संशयास्पद उत्तरे मिळत होती. संशय बळावल्याने बहिणीने ही गोष्ट तात्काळ घरच्यांना सांगितले आणि कुटुंबीयांनी पोलिसांकडे संशय व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ तपासाची दिशा बदलून संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवताच दोघांनी पोपटासारखे बोलून आपला गुन्हा कबूल केला.

या बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आणि हत्येचा नेमका कट, त्यामागील इतर कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या कोठडीची मागणी केली. तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला आहे. या कालावधीत पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी करण्यात येणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता तपासातील पुढील घडामोडींकडे लागले आहे.

– डिजिटल मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य नाव:

‘Press Media Live’


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!