— मृतदेहावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा तीव्र निषेध; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा हल्लाबोल…

पुणे : सुफी, संत आणि एकमेकांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या अहिल्यानगरच्या मातीत आज राजकीय स्वार्थाचा विषारी धूर पसरवला जात आहे. धीरज परदेशी या तरुण मुलाचा जीव गेला; एका घराचा कुलदीप वीज पडल्यागत कोलमडला. या दुःखावर सांत्वनाची फुंकर घालण्याऐवजी, स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी काही नेत्यांनी या हत्येला धार्मिक रंग देऊन शहराला आगीच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न केला. हा केवळ राजकीय स्टंट नसून मानवतेला काळिमा फासणारा प्रकार आहे, अशा अत्यंत संवेदनशील आणि भावूक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.

पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अहिल्यानगरच्या बिघडवलेल्या वातावरणावर दुःखी अंतःकरणाने भाष्य केले. “धीरजची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली, हे पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले आहे. तरीही कपाळाच्या टिळ्यावरून, पाकिस्तान-फिलिस्तीनच्या नावाखाली समाजात द्वेषाचे जहर पेरण्याचे काम आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर आणि अक्षय कर्डिले यांनी केले. संविधानाची शपथ घेऊन भाऊ-भाऊ लढवणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
*”एका तरुणाचा मृतदेह समोर असताना त्यावर राजकारणाची पोळी भाजणे ही संस्कृती नव्हे. शहरात निर्माण केलेला हा विद्वेषाचा अंधार दूर करण्यासाठी मी स्वतः अहिल्यानगरच्या गल्लीबोळात जाऊन सामान्यांशी संवाद साधेन आणि सत्यशोधन समितीद्वारे खरा चेहरा समाजासमोर आणेन,”* असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
**द्वेषाच्या आगीत बंधुभावाची फुंकर: किरण काळे यांचा ‘समता पगडी’ने सन्मान..
एकीकडे राजकारणी आगीत तेल ओतत असताना, दुसरीकडे मात्र माणुसकी जपणारे हातही शांततेसाठी पुढे आले. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते किरण काळे यांनी या संवेदनशील काळात अत्यंत संयमाने काम करत शहराला दंगलीच्या खाईत जाण्यापासून वाचवले. अशा कठीण प्रसंगी शांततेचा संदेश देणाऱ्या किरण काळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य ठरते.
प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून पुणे येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने किरण काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची प्रतीक असलेली ‘समता पगडी’ त्यांना परिधान करण्यात आली, तेव्हा उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
या प्रसंगी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे सदस्य मौलाना निजामुद्दीन फकृद्दीन, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, जमियत उलेमा हिंदचे हाफिज मुबशशीर, इक्बाल शेख सर, हाफिज अजमतुल्लाह खान, इब्राहिम यवतमाळवाला, मोईन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


























