ना बॅंड-बाजाचा अवाढव्य खर्च, ना कर्जाचा फास ! शिंगाडे ट्रस्ट तर्फे एप्रिल मध्ये रंगणार ‘रॉयल’ सामूहिक विवाह सोहळा !

बेडकीहाळ (प्रतिनिधी):
अहो, आजच्या काळात लग्न म्हटलं की बापाच्या अंगावर काटा येतो! मंडपाच्या भाड्यापासून ते बँडवाल्याच्या तोऱ्यापर्यंत, मध्यमवर्गीयांचे पार कंबरडे मोडते. कर्जाचा फास आवळून लग्न करण्याची ही घातक प्रथा समाजाला पोखरत आहे. पण या अंधारात आशेचा एक किरण बेडकीहाळच्या मातीत चमकला आहे! कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टने या सर्व उधळपट्टीला फाटा देत, एप्रिल महिन्यात भव्य ‘रॉयल’ सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.
आयपीएल लग्नाचा खर्च आता ट्रस्टचा !
ज्या बापाच्या डोळ्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेचं पाणी आहे, त्यांच्यासाठी डॉ. विक्रम शिंगाडे धावून आले आहेत. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे— विवाहाचा संपूर्ण खर्च ट्रस्ट करणार आहे! एवढेच नाही, तर वधूला मानाचे मंगळसूत्र, जोडवी आणि साडी दिली जाणार आहे, तर वराला ड्रेस व उपरणे देऊन सन्मानाने बोहल्यावर चढवले जाईल. ३०-३० वऱ्हाडी घेऊन या आणि थाटात लग्न लावून जा, असा हा ‘रॉयल’ थाट असणार आहे.
कायदेशीर सुरक्षेची हमी !
नुसत्या अक्षता टाकून हे कार्य थांबणार नाही. आजच्या जगात कायदेशीर कागदपत्रांना महत्त्व आहे, हे ओळखून लग्न सोहळ्यानंतर सरकारी नियमानुसार विवाह रजिस्टर नोंदणी (Marriage Registration) देखील करून दिली जाणार आहे. म्हणजे संसारही सुखाचा आणि कायदेशीररीत्या पक्का!
नोंदणीसाठी अल्प कालावधी !
ज्या गरजू वधू-वरांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपली नावे १० एप्रिल पर्यंत नोंदवणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत:
वधू व वराचे आधारकार्ड
शाळेचा दाखला (L.C.)
प्रत्येकी ८ पासपोर्ट साईज फोटो
जातीचा दाखला व उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
डॉ. विक्रम शिंगाडे यांचे आवाहन :
“समाजातील गोरगरीब जनतेला आर्थिक संकटातून वाचवणे आणि सन्मानाने गृहस्थाश्रम सुरू करून देणे, हेच आमच्या ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले आहे.



























