पिंपरी-चिंचवड हादरले ! RPI कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची निर्घृण हत्या


जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, आरपीआय कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

चंद्रशेखर पात्रे :

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आरपीआय कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची काही अज्ञातांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात भीतीचे सावट पसरले असून आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आक्रमक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मोशी येथील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे रात्री सुमारे नून वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल मोरे हे या परिसरात असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हत्येची बातमी समजताच आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.

सध्या अनिल मोरे यांचे पार्थिव यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (YCM) येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. मात्र, “जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा आक्रमक इशारा आरपीआय कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यामुळे रुग्णालय परिसर आणि मोशी भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात एका प्रमुख नेत्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

 

#PimpriChinchwad #CrimeNews #AnilMore #RPI #KamgarAghadi #Moshi #PuneCrime #BreakingNews #JusticeForAnilMore #PoliceInvestigation #पिंपरीचिंचवड #अनिलमोरे #आरपीआय #गुन्हेगारी #मराठीबातम्या


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!