झोपा आता खुशाल ; व्यायाम करेल मशीन आणि घाम गाळेल लोखंड!


झोपा आता खुशाल ; व्यायाम करेल मशीन आणि घाम गाळेल लोखंड!

 

मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार 

पुणे: अहो, विज्ञानाने काय दिवे लावलेत बघा! आजवर आम्ही ऐकलं होतं की माणूस यंत्राला चालवतो, पण आता यंत्रच माणसाला ‘हलवणार’ आहे. बाजारात म्हणे एक नवं मशीन आलंय. तुम्ही फक्त त्यावर प्रेतासारखं आडवं व्हायचं, डोळे मिटायचे आणि घोरत पडायचं. मग ते मशीन तुमच्या पायाला धरणार, हाताला खेचणार आणि तुमचं शरीर असं काही घुसळून काढणार की जणू काही तुम्ही व्यायाम नाही, तर लोणच्याची बरणी झाला आहात!

व्यायाम की ‘मुलखाचा’ आळस?

अहो, व्यायामाची व्याख्याच बदलून टाकली या करंट्यांनी! पूर्वी व्यायामाचा ‘व’ म्हटलं तरी अंगाला घाम फुटायचा, आता इथं मशीनच्या गुदगुल्या सोसल्या की म्हणे तब्येत कमावता येते. हा व्यायाम आहे की शरीराची ‘सर्व्हिसिंग’? उद्या कुणीतरी असंच मशीन काढेल आणि म्हणेल, “अत्रे साहेब, तुम्ही फक्त झोपा, तुमच्या वतीने भाषणं द्यायला आम्ही मशीन लावलंय!” अहो, ज्या व्यायामात कष्ट नाहीत, तो व्यायाम कसला? तो तर निव्वळ देहाचा अपमान आहे!

मेली ती जिद्द आणि गेला तो जोर..!  

आमच्या काळी मारुतीच्या मंदिरात शंभर शंभर जोर काढताना अंगातलं रक्त उसळायचं. दंड थोपटले की आवाज व्हायचा. आताची ही ‘झोपलेली’ पिढी! स्वतःच्या हाताने साखरेचा डबा उचलण्याची ज्यांना हिंमत नाही, ते म्हणे मशीनवर झोपून दंड कमावणार!

“अहो, झोपून जर शरीरं कमवता आली असती, तर कुंभकर्ण हा या जगाचा ‘मिस्टर युनिव्हर्स’ ठरला असता!”

यंत्राचा चमत्कार आणि माणसाचा अवतार!

कल्पना करा, तुम्ही मशीनवर झोपला आहात. मशीन तुमचे पाय वर करतंय, हात बाजूला करतंय आणि तुम्ही मध्येच स्वप्नात “वडापाव द्या” म्हणून ओरडताय! हे दृश्य पाहून विधात्यालाही वाटेल की, “काय हा प्राणी मी जन्माला घातला आणि हा आता यंत्राच्या तालावर कसा नाचतोय?” हे मशीन म्हणजे आळसाचं अधिकृत प्रतीक आहे.

सावधान!

या विज्ञानाच्या नादाला लागून स्वतःचं ‘यंत्र’ करू नका. जो माणूस स्वतःच्या इच्छेने हात हलवत नाही, त्याला उद्या हे मशीनच घराबाहेर फेकून देईल, हे नक्की! विज्ञानाची प्रगती खुशाल करा, पण शरीराला ‘कोळसा’ आणि मनाला ‘मशिन’ बनवू नका. नाहीतर पुढच्या पिढीला सांगायला लागेल, “आमचे आजोबा खूप कष्टाळू होते, ते दिवसातून दोन तास मशीनवर ‘झोपून’ व्यायाम करायचे!”

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!