माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नसरापूर घटनेचा पुण्यात तीव्र निषेध ; कॅन्डल मार्चद्वारे वाहिली श्रद्धांजली

पुणे :नसरापूर येथे घडलेल्या त्या दुर्दैवी आणि माणुसकीला लज्जित करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका निष्पाप मुलीवर झालेल्या या अन्यायाचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पुणे शहराध्यक्ष राजेभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी राजेभाऊ कांबळे यांनी प्रशासनाला आवाहन केले की, या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा. विशेष म्हणजे, अशा गुन्हेगाराची बाजू कोणत्याही वकिलाने कोर्टात मांडू नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी जाहीर केली. जर एखाद्या वकिलाने अशा नराधमाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला, तर भीमसैनिक त्याला नक्कीच जागा दाखवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निषेध आंदोलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक फिरोज मुल्ला, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पारखे, रयत संघटनेचे ऋषिकेश गायकवाड, आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे आणि पंचशील तरुण मित्र मंडळाचे सुनील कांबळे यांचा समावेश होता.
या प्रसंगी राहुल घोडके, अक्षय कटके, बाबा हरी सोनवणे, सचिन शिंदे, रोहित कांबळे, नवनाथ वाघमारे, अशोक पवार, राजू कांबळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या पेटवून पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समाजातील अशा विकृतीचा नायनाट झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


























