नावात ‘यश’ पण नशिबात ‘अपयश’; स्पेलिंगच्या फासावर सर्वसामान्यांचा बळी.!


नावात ‘यश’ पण नशिबात ‘अपयश’; स्पेलिंगच्या फासावर सर्वसामान्यांचा बळी!

विल्यम शेक्सपिअर नावाचा तो विलायती कवी सांगून गेला की, “नावात काय आहे?” अहो विल्यमराव, तुम्ही आज या ‘डिजिटल इंडिया’त जन्माला आला असता, तर तुम्हाला कळलं असतं की नावात नाही, तर नावातल्या एका ‘काण्या-मात्रेत’ आणि ‘स्पेलिंग’मध्ये माणसाचं मरण दडलंय! एका बाजूला डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला एका सामान्य माणसाला त्याच्या हक्काच्या नावासाठी सरकारी कचेऱ्यांच्या उंबरठ्यावर भिकाऱ्यासारखं उभं करायचं, हा तर साक्षात ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ आहे!

॥ आजचा तडाखा ॥
सरकार राजकारणात व्यस्त…
आणि जनता ‘दुरुस्ती’ करण्यात व्यस्त!
(खिशात नाही आणा, अन् स्पेलिंग दुरुस्त करायला म्हणा!)
‘A’ चा घोळ अन् ‘E’ चा काळ.!
अहो, त्या बिचाऱ्या कष्टकऱ्याचं नाव ‘यशवंत’! आधारकार्डवर कुणीतरी महान टंकलेखकानं ते ‘Yeshwant’ करून ठेवलं, तर पॅनकार्ड आणि वोटर आयडीवर तो ‘Yashwant’ आहे. आता या ‘A’ आणि ‘E’ च्या युद्धात त्या गरिबाचा जीव कंठाशी आलाय. बँका त्याला हाकलून लावतात, सरकारी योजनांचे लाभ त्याला नाकारले जातात. जणू काही एका स्पेलिंगमुळे त्याचं अस्तित्वच धोक्यात आलंय! आज सामान्य जनतेच्या तोंडात एकच वाक्य आहे— “या स्पेलिंगच्या दुरुस्तीच्या नादात आम्ही आमचं सगळं ‘दुरुस्त’ गमावून बसलोय!” माणसाचं नशीब दुरुस्त करण्याऐवजी सरकार फक्त कागदं दुरुस्त करायला लावतंय.
पाच वर्षांच्या पोरालाही ‘आधार’चा फास..!

हद्द तर बघा, पाच वर्षांच्या निरागस पोराला शाळेत घालायचं असेल, तरी या सरकारला त्याचं ‘आधार कार्ड’ लागतं. त्या पोराला अजून ‘अ’ अननसाचा नीट उच्चारता येत नाही, तोवर सरकार त्याच्या ‘स्पेलिंग’ची कुंडली मांडून बसतं. अहो, फक्त ‘लग्न जमवताना’ काय ते आधार आणि पॅनकार्ड लागत नाही, बाकी मरण सोसलं तरी चालेल, पण कागदावरचं स्पेलिंग चुकलं तर या सरकारला चालत नाही! लग्नाच्या पत्रिकेत नाव चुकलं तर अक्षता पडतात, पण सरकारी कागदात नाव चुकलं तर थेट लाथा मिळतात, अशी आजची परिस्थिती आहे.

महागाईच्या ओझ्याखाली ‘दुरुस्ती’चा दणका!
आज सामान्य नागरिक प्रचंड महागाईच्या ओझ्याखाली कसाबसा जगतोय. घर कसं चालवायचं या विवंचनेत असलेल्या माणसाला आता ‘दुरुस्ती’च्या खर्चाचा नवीनच झटका दिला जातोय. एक अक्षर बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र करा, वकिल-एजंटला पैसे द्या आणि सरकारी खिडक्यांचे हेलपाटे मारा! या नको त्या ‘दुरुस्ती’च्या खर्चाने सामान्य माणूस अक्षरशः वैतागून गेला आहे. खिसा रिकामा आणि डोकं गरम, अशी आजच्या नागरिकाची अवस्था आहे.
मराठीचा आग्रह का नसावा?

आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जर हे सगळं कारभार थेट मराठीत असता, तर हा घोळ झालाच नसता ना! ‘यशवंत’ हे नाव मराठीत लिहायला किंवा वाचायला कोणत्याही मराठी माणसाला अडचण आली नसती. पण नाही, साहेबांना इंग्रजीचं भारी कौतुक! ज्या भाषेचा आणि इथल्या मातीचा काडीचा संबंध नाही, त्या भाषेतील स्पेलिंगवरून तुम्ही माणसाचं नशीब ठरवणार का?

“लक्षात ठेवा, ज्या दिवशी हा ‘यशवंत’ जागा होईल आणि आपला संताप व्यक्त करेल, त्या दिवशी तुमच्या सत्तेच्या स्पेलिंगमधली अक्षरं बदलायलाही तुम्हाला वेळ मिळणार नाही! सरकारला आमचा एकच इशारा आहे— लोकांची घरं आणि मनं दुरुस्त करण्यावर लक्ष द्या, स्पेलिंगच्या दुरुस्तीत सामान्य माणसाचा बळी घेऊ नका!”

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!