अतुल लिमये यांचा पुण्यातून गर्जना; दादा लाड आणि भारतभूषणजी महाराजांचा ‘श्रीगुरुजी पुरस्कारा’ने जयजयकार!
पुणे : ज्या समाजात कष्टाचा घाम सांडतो आणि निष्ठेची ज्योत तेवत राहते, तिथेच खऱ्या अर्थाने परिवर्तनाची पहाट होते! समाजकार्यात केवळ स्वतःपुरते दिवे उजळून चालणार नाही, तर त्या प्रकाशाचा झोत अख्ख्या समाजाच्या अंधारावर पडला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी शनिवारी पुण्यात केले. निमित्त होते, जनकल्याण समितीतर्फे आयोजित ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ सोहळ्याचे!

या दिमाखदार सोहळ्यात शेतीतील प्रयोगशील ऋषी दादा लाड आणि आध्यात्मिक प्रबोधनाचे दीपस्तंभ महंत भारतभूषणदासजी महाराज यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, सन्मानपत्र आणि एक लाखाची थैली देऊन या दोन्ही तपस्वींचा सन्मान झाला, तेव्हा विमाननगरच्या त्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला नाही तरच नवल!
सरकारच्या कुबड्या फेकून द्या!
अतुल लिमये यांनी आपल्या भाषणात समाजाच्या डोळ्यात अंजन घातले. ते म्हणाले, “आज समाज प्रत्येक कामासाठी सरकारच्या तोंडाकडे पाहतोय. ही परावलंबित्वाची वृत्ती समाजाला अपंग करणारी आहे. जर आपल्याला ‘विकसित भारत’ पाहायचा असेल, तर यशस्वी प्रयोगांची एक आदर्श कार्यप्रणाली तयार करून ती घराघरांत पोहोचवायला हवी. व्यवस्था परिवर्तन हे भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनच घडेल!”
कापूस हा गळफास नव्हे, वैभव!
पुरस्काराला उत्तर देताना दादा लाड यांनी विदर्भातील शेतीचे वास्तव मांडले. “कापूस म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पीक, हा डाग मला पुसायचा होता. बोंडाचे वजन वाढवून एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन नेण्याचे तंत्र मी विकसित केले. कापूस हा गळफास नसून ते शेतकऱ्याचे वैभव आहे,” असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगताच अनेकांच्या डोळ्यात अभिमानाचे पाणी तरळले.
एका कोटीची महादेणगी!
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे, ख्यातनाम उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांनी ‘हिंदुत्वा’ची व्याख्या अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. “हिंदुत्व ही केवळ एक विचारधारा नसून ती प्रत्यक्ष जगण्याची रीत आहे,” असे सांगत त्यांनी जनकल्याण समितीच्या कार्याला एक कोटी रुपयांची घसघशीत देणगी जाहीर करून उपस्थितांची मने जिंकली.


























