रविवार विशेष : बनवा… पण किती ? ‘बनवा बनवी’च्या जागतिक बाजारात हरवलेला सामान्य माणूस !


रविवार विशेष : बनवा… पण किती ? ‘बनवा बनवी’च्या जागतिक बाजारात हरवलेला सामान्य माणूस !

मेहबूब  सर्जेखान :

(मुख्य संपादक, प्रेस मीडिया लाईव्ह)

नमस्कार,

खरं तर, या ‘बनवा बनवी’ची मुहूर्तमेढ आपल्या घरापासूनच रोवली जाते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घराघरांत ही कला जोपासली जाते. आई मुलाला ‘दोन मिनिटात’ जेवण तयार होतंय म्हणून बनवते, तर मुलं अभ्यासाचा आव आणून मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात पालकांना बनवत असतात. नवऱ्याने विचारलं, “भाजी कशी झाली आहे?” तर ती जेमतेम असली तरी ‘छान आहे’ म्हणून गोड हसून त्याला बनवणारी पत्नी, आणि ऑफिसमध्ये काम नसतानाही ‘आज खूप लोड आहे’ सांगून घरच्यांना बनवणारा नवरा… ही कौटुंबिक बनवा बनवी म्हणजे सुखी संसाराचा ‘सिमेंट’ झाली आहे की काय, असं वाटू लागलं आहे!

घराबाहेर पडलो की या फसवणुकीचे पुढचे अंक सुरू होतात  त्यात रविवार म्हटलं की माणसाला निवांतपणा हवा असतो, पण सध्याच्या काळात ‘न बनता’ निवांत जगणं जवळजवळ अशक्य झालंय. जगात सध्या एकाच कलेचा सुकाळ आहे, ती म्हणजे— ‘बनवा बनवी’.  अत्र्यांच्या शैलीत सांगायचे तर, “माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे की नाही नको ठाऊक, पण तो दुसऱ्याला ‘बनवणारा’ प्राणी नक्कीच आहे!”

राजकारणात तर सध्या ‘निष्ठा’ हा शब्द फक्त शब्दकोशातच शिल्लक उरला आहे. सकाळी एका विचारधारेला नमस्कार करणारे संध्याकाळी दुसऱ्याच विचारधारेचे ‘तोरण’ बांधताना दिसतात. मतदाराला वाटतं, आपण लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलं, पण प्रत्यक्षात सत्तेच्या बुद्धिबळावरील प्यादी रोज आपले रंग बदलत असतात. ही राजकीय ‘बनवा बनवी’ पाहून मतदाराने डोक्यावर हात मारून घेऊ नये तर काय करावं?

सध्या ‘ॲडमिशन’चा मोसम सुरू आहे आणि या काळात शाळांच्या प्रमुखांची ‘बनवा बनवी’ पाहण्यासारखी असते. मुलाला शाळेत दाखला घ्यायला जावं, तर त्या शाळेचे प्राचार्य किंवा चालक एखाद्या मोठ्या कंपनीच्या ‘सेल्समन’लाही लाजावेल असं मार्केटिंग करतात. “आमचीच शाळा कशी जगात भारी आहे, आमच्याकडे कसं ‘इंटरनॅशनल’ दर्जाचं शिक्षण मिळतं, आणि आमची इमारत कशी वातानुकूलित आहे,” याचंच ते गोडवे गात असतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पालक लाखो रुपये मोजतात, पण नंतर लक्षात येतं की, शाळेची इमारत ‘इंटरनॅशनल’ असली तरी तिथल्या शिक्षणाचा दर्जा मात्र ‘लोकल’ सुद्धा नाहीये! ही शैक्षणिक ‘बनवा बनवी’ पालकांच्या खिशाला आणि मुलांच्या भवितव्याला मोठी कात्री लावणारी ठरते.

घराबाहेर पडलो की पावलोपावली हेच अनुभव! मटणाच्या दुकानात गेल्यावर तो खाटिक दाखवताना चांगलं मटण दाखवतो आणि पिशवीत भरताना मात्र हाडं भरून देतो. घरी कुकरची शिट्टी वाजल्यावर कळतं की, खाटकाने आपल्याला कसं ‘बनवलं’ आहे. मेडिकलमध्ये जावं तर तिथे वेगळीच तऱ्हा. डॉक्टरने लिहिलेलं औषध सोडून मेडिकलवाला “दुसऱ्या कंपनीचं घ्या, कंटेंट तोच आहे” असं सांगून आपली ‘वैद्यकीय’ बनवा बनवी करतो. साधे चष्म्याच्या दुकानात गेल्यावर “काच फुटेल, फायबर घ्या” म्हणून आपल्याला महागडा चष्मा गळ्यात मारणारा दुकानदार आणि “भाजी अगदी गावरान आहे” म्हणून सांगणारा भाजीवाला… हे सगळे सामान्य माणसाला लुटण्यात पटाईत झाले आहेत.

आणि आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातली ‘बनवा बनवी’ तर फारच थोर! एखाद्या धनदांडग्याकडे जाहिरात मागायला जावं, तर तो कोट्यवधींची उलाढाल बाजूला ठेवून डोळ्यात पाणी आणून सांगतो, “अहो, सध्या परिस्थिती खूप बिकट आहे, मार्केटमध्ये पैसाच नाही!” त्याची ती केविलवाणी मुद्रा पाहून वाटतं, जाहिरात मागण्याऐवजी आपणच याला चार आणे मदत करावी की काय!

या ‘बनवा बनवी’च्या बाजारात भरडल्या जाणाऱ्या जनतेच्या प्रतिक्रिया तर अंगावर येणाऱ्या आहेत. कुणी खाटकावर वैतागलंय, तर कुणी शाळांच्या डोनेशनवर. कुणी म्हणतं, “आजकाल खरं बोलणारा माणूस शोधणं म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखं झालंय.”

अहो, बनवाबनवीलाही काही शास्त्र असतं, काही दर्जा असतो! पण सध्याच्या या बाजारात कल्पकता संपली आहे आणि फक्त धूळफेक उरली आहे. या सगळ्या गदारोळात आमचा ‘सामान्य माणूस’ मात्र इतका ‘बनला’ आहे की, आता त्याला आरशात स्वतःचा चेहरा पाहतानाही शंका येते— की हा मीच आहे, की मला कुणी ‘बनवून’ इथे उभं केलं आहे?

असो, ही  ‘बनवा बनवी’  लेख कुणाच्याही मनाला न लागता, केवळ मेंदूला विचार करायला लावेल, अशी आशा करतो!

शुभ रविवार!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!