
५२ कोटींचा महाघोटाळा : रविराज काळेंचा कडाडा, भ्रष्ट ‘मलिदा गँग’च्या नरडीला नख !
पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीवर रात्रीच्या अंधारात ५२ कोटींचा दरोडा टाकणाऱ्या भ्रष्ट टोळीचे वस्त्रहरण करत, आम आदमी पार्टीचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी आता रणशिंग फुंकले आहे. “जनतेच्या कष्टाचा पैसा मटकावणाऱ्या या मलिदा गँगला आता सुट्टी नाही,” असा इशारा देत काळेंनी प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
या महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन असून, त्यांनी कोणत्याही बजेटची तरतूद नसताना ७० हून अधिक बिले परस्पर अदा केली आहेत. धक्कादायक म्हणजे, पालिकेच्या बँक ऑफ बडोदामधील मुदत ठेवी (FD) मोडून ठेकेदारांचे खिसे भरण्यात आले आहेत. ज्या कामांशी संबंध नाही अशा विभागांना अंधारात ठेवून, केवळ नगरसेवकांच्या सह्यांच्या जीवावर हा ५२ कोटींचा मलिदा वाटला गेला.
रविराज काळे यांची आक्रमक मागणी:
१) घोटाळेबाज अधिकारी प्रवीण जैन यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा.
२) या पापावर सह्या करणाऱ्या नगरसेवकांना पालिकेत येण्यास कायमची बंदी घाला.
३) या संपूर्ण ‘दरोड्याची’ उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करा.
हा केवळ तांत्रिक घोळ नसून अधिकारी, ठेकेदार आणि नगरसेवक यांनी संगनमताने जनतेच्या पैशावर टाकलेला थेट दरोडाच आहे. या भ्रष्टाचारी टोळीला सक्तीच्या रजेवर पाठवा, अन्यथा जनरेटा काय असतो हे दाखवून देऊ, अशी जळजळीत गर्जना रविराज काळे यांनी केली आहे.



























