‘आजोबा’ नावाचं आभाळ कोसळतं, तेव्हा…
मेहबूब सर्जेखान :
अहो, जगाच्या बाजारात हजारो नाती मिळतील, पण आजोबा आणि नातू या नात्याचं रसायन काही औरच असतं! हे नातं म्हणजे ‘अनुभव’ आणि ‘कुतूहल’ यांचा झालेला एक सुंदर संगम आहे. लोक म्हणतात नातू म्हणजे मुदलापेक्षाही प्रिय असलेलं ‘व्याज’ असतं, पण खरं सांगू? हे केवळ व्याज नसतं, तर उतारवयात आजोबांना मिळालेलं एक नवं ‘आयुष्य’ असतं. हे नातं जगातील इतर सर्व नात्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं, कारण यात ना वयाचं बंधन असतं, ना औपचारिकतेचा बुरखा!
आजोबा आणि नातू यांच्यात वयाचं अंतर कितीही असलं, तरी मनाचं अंतर मात्र शून्य असतं. नातवासाठी आजोबा हे त्याचे पहिले मित्र, पहिले घोडा-घोडा खेळणारे साथीदार आणि गुपितं लपवणारे पहिले ‘तिजोरी’ असतात. घरामध्ये कधी आई-वडिलांनी मुलाला काही कारणाने रागवले, की त्या चिमुरड्याचा चेहरा पडतो, डोळ्यात पाणी येतं. पण अशा वेळी जेव्हा आजोबांचा तो मायेचा आणि अनुभवाने थरथरणारा प्रेमळ हात नातवाच्या डोक्यावरून फिरतो, तेव्हा जादू व्हावी तसा त्या नातवाचा सारा राग आणि दुःख एका क्षणात विरघळून जातं! आई-वडिलांच्या ओरड्यापासून वाचवणारं ते हक्काचं कवच म्हणजे आजोबा!
अहो, नात्याची विण किती घट्ट असते बघा— नातवाला साधा ताप जरी आला तरी आजोबांच्या डोळ्यांतली झोप उडते! त्या चिमुरड्याचं कपाळ गरम लागलं की आजोबा स्वतःची भूक-तहान विसरून जातात. आपलं दुखणं-खुपणं विसरून ते फक्त नातवाच्या उशाशी बसून राहतात. नातू सकाळी उशिरा उठला तरी आजोबांना चैन पडत नाही आणि आजोबांना उठायला उशीर झाला की तो नातू कावराबावरा होतो. ही ‘ओढ’ रक्ताच्या पलीकडची, श्वासांची असते. नातवाला घास भरवताना आजोबा स्वतः बालक होतात आणि त्याच्या बोबड्या बोलात स्वतःचं बालपण शोधतात.
पण जेव्हा काळाचा पडदा अचानक ओढला जातो आणि आजोबा सर्वांना सोडून कायमचे निघून जातात, तेव्हा तो नातू एकाएकी पोरका होतो. घराचा तो ‘मोठा मित्र’ हरवलेला असतो. तो चिमुरडा घरभर ‘आजोबा… आजोबा…’ म्हणून हाका मारतो, प्रत्येक खोलीत त्यांना शोधतो, पण उत्तरादाखल येते ती फक्त एक सुन्न शांतता. ज्या आजोबांच्या खांद्यावर सतत खेळण्याची त्याला सवय झाली आहे, तिथून आजोबा अचानक गायब झाल्यामुळे तो जीव पार अस्वस्थ होतो.
आई-वडिलांनी कितीही समजावलं, समजावून सांगता सांगता त्यांचं तोंड वाळून गेलं, तरी त्या निष्पाप मनाला कसं सांगावं की, ज्या खांद्यावर तू कालपर्यंत बसून जग पाहत होतास, तो खांदा आता कायमचा विसावला आहे? घर पालथं घातलं तरी आपला सखा दिसत नाही, हे दुःख त्या लहान जिवाला पचवणं अशक्य असतं. खरोखर, ‘आजोबा’ नावाचं आभाळ जेव्हा कोसळतं, तेव्हा मागे उरतो तो केवळ एक कधीही न थांबणारा हुंदका आणि आठवणींच्या रूपाने काळजात कायमचं घर करून राहिलेला तो प्रेमळ स्पर्श! खरोखरच, काय नाते असते हे!




























