अधीक्षक अतुल कानडे यांची धडक मोहीम; फुगेवाडी-हडपसरच्या शोकांतिकेनंतर विषारी दारूच्या साम्राज्याला सुरुंग..!

पुणे : फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथील मेथेनॉलमिश्रित मद्य प्राशनाच्या दुर्दैवी घटनेनंतर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व विक्रीविरुद्ध जोरदार पावले उचलली आहेत. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ मे ते ४ जून या कालावधीत विभागाने राज्यभर धडक कारवाई करत १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या मोहिमेत एकूण १४२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, ११६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान ८ हजार ४७२ लिटर तयार गावठी दारू आणि ६९ हजार २७१ लिटर विषारी रसायन नष्ट करण्यात आले आहे. तसेच, अवैध वाहतुकीसाठी वापरलेली ११ वाहने आणि ११ हजार ७३३ लिटर बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांमधील हातभट्टी केंद्रे नेस्तनाबूत करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ९३ नुसार १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सीआयडी तपासासह समन्वय साधून, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे. यासोबतच, महावितरणला वीज जोडण्या तोडण्याचे आणि मेथेनॉल पुरवठादारांना नियमांचे पालन करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
अधीक्षक अतुल कानडे यांनी नागरिकांना या बेकायदेशीर धंद्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अवैध दारू व्यवसायाची माहिती असल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ वर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. प्रशासनाची ही कारवाई आता एक निरंतर प्रक्रिया होऊन विषारी दारूच्या या विळख्यातून शहराची सुटका होईल, हीच नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.
#PuneNews #PressMediaLive #ExciseDepartment #AtulKanade #AntiLiquorDrive #PuneCrime #SocialAwareness #NashamuktBharat #PuneUpdates #MaharashtraPolice

























