अग्रलेख : गुरुजींना आता ‘मॅपिंग’चे इंजेक्शन की सरकारी छळवणुकीचा डोस?


अग्रलेख : गुरुजींना आता ‘मॅपिंग’चे इंजेक्शन की सरकारी छळवणुकीचा डोस?

– प्रेस मीडिया लाईव्हच्या लेखणीतून

महाराष्ट्राच्या शिक्षण पंढरीत सध्या एक अजब ‘तमाशा’ सुरू आहे. या तमाशाचे दिग्दर्शन खुद्द शिक्षण विभागाने केले असून, त्याचे बळी ठरत आहेत बिचारे आमचे गुरुजी! “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु…” हे श्लोक आता फक्त भाषणांपुरते उरले आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आमचा शिक्षक हा ‘ब्रह्मा’ नसून केवळ सरकारी फतव्यांचा ‘वेठबिगार’ झाला आहे की काय, असा संशय यायला लागला आहे.

‘मॅपिंग’ की शिक्षकांचे ‘बॅंड-बॅाजा-बारात’?

अहो, हे ‘मॅपिंग’ नावाचे भूत नक्की आले कोठून? एका बाजूला पोरांच्या परीक्षा, निकालाची धावपळ आणि त्यात भर म्हणून निवडणूक आयोगाचे ‘पुनरीक्षण’ नावाचे चर्मचक्षू! हे कमी पडले म्हणून की काय, आता ‘सेल्फ मॅपिंग’ आणि ‘प्रॉक्सी मॅपिंग’ नावाची दोन विलायती भुते शिक्षकांच्या मानगुटीवर बसवली आहेत. १० एप्रिल ते २० एप्रिल या अवघ्या दहा दिवसांत १०० टक्के काम करा, नाहीतर कारवाई !

काय समजता हो शिक्षकांना? शिक्षक म्हणजे काय तुमच्या खिशातला एखादा ‘स्मार्टफोन’ आहे का? की बटन दाबले की डेटा डाऊनलोड झाला आणि चार्जिंग संपले की फेकून दिला? अहो, तो रक्तामासाचा माणूस आहे. त्यालाही घरदार आहे, सण-वार आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत गुरुजींना स्वतःच्या घराचा पत्ता विसरावा लागेल आणि नकाशावर फक्त ‘मॅपिंग’च शोधत बसावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत!

प्रशासनाची ‘उलटी’ गंगा!
शासनाच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे. संचमान्यता झाली पण समायोजन रखडले. आता पुन्हा पट-पडताळणी? हे म्हणजे लग्नाचं वऱ्हाड दारात आलंय आणि नवरदेव अद्याप पाळण्यातच आहे, असा हा अजब प्रकार आहे! शाळेत जेवण नाही पण पाहुण्यांना थाळी मांडायला सांगण्यासारखा हा ‘रयतेचा राजा’ कारभार आहे.

शिक्षक विचारतोय, “मी मास्तर आहे की डेटा एन्ट्री ऑपरेटर?” पण प्रशासनाला याचे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना फक्त आकडे हवे आहेत. मग त्या आकड्यांच्या चक्रव्यूहात शिक्षकाचा श्वास कोंडला तरी चालेल!

सांभाळा, नाहीतर अनर्थ होईल !

शिक्षक भारतीने जो आवाज उठवला आहे, तो केवळ इशारा नाही तर तो महाराष्ट्रातील गुरुजींच्या काळजाचा ठोका आहे. “तपासणी पुढे ढकला, नाहीतर शिक्षकच पुढे ढकलले जातील!” हा संदेश म्हणजे व्यवस्थेच्या कानशिलात लगावलेला एक सणसणीत टोला आहे.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते—

अहो सरकार, जर गुरुजींना माणूस म्हणून जगू दिले नाही, तर उद्याच्या पिढीला ‘माणुसकी’ शिकवायला कोणीच उरणार नाही. शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अन्यथा, ज्या लेखणीने हे गुरुजी भविष्य घडवतात, तीच लेखणी उद्या तुमच्या या अजब कारभाराचे वाभाडे काढायला मागे-पुढे पाहणार नाही!

लक्षात ठेवा, शाळेत पोरं नसतील तरी चालेल, पण शाळेत मास्तरच उरला नाही, तर तुमचं हे डिजिटल इंडियाचं स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरतील!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!