कविवर्य सुरेश भट यांनी आपल्या मागे लिहित्या पिढ्या निर्माण केल्या : प्रसाद कुलकर्णी


कविवर्य सुरेश भट यांनी आपल्या मागे लिहित्या पिढ्या निर्माण केल्या : प्रसाद कुलकर्णी

इचलकरंजी:  मराठी गझल या काव्यप्रकारासाठी आयुष्यभर झिजणारे गझलसम्राट सुरेश भट यांनी केवळ स्वतःचे साहित्य निर्माण केले नाही, तर शेकडो कवींना लिहिते करून गझलकारांच्या पिढ्या घडवल्या. मराठी कवितेच्या इतिहासात सुरेश भट हे खऱ्या अर्थाने ‘इतिहास पुरुष’ आहेत, असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने कविवर्य सुरेश भट यांच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक संजय भस्मे यांच्या हस्ते सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले की, सुरेश भट यांनी आपल्या कवितेतून जातीयतेविरुद्धचा विदारक अनुभव आणि मानवी मनोव्यापारांचे चित्रण अतिशय प्रभावीपणे मांडले. त्यांच्याइतके प्रखर सामाजिक भान असलेला कवी विरळाच असतो. कोणत्याही जातीय दंगलीत पक्षी किंवा झाडे मारली जात नाहीत, तर केवळ माणसे मारली जातात, ही दाहक जाणीव करून देणाऱ्या सुरेश भटांना मानवतेची जपणूक करणारी कविता नेहमीच जवळची वाटली.

स्वतःच्या शब्दांवर अदम्य विश्वास असणाऱ्या या कवीने मराठी कवितेचे दालन विविध प्रकारांनी समृद्ध केले. “जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा, घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची” अशा शब्दांतून त्यांनी आपल्या लेखणीचा प्रभाव भविष्यावर राहील याची ग्वाही दिली होती.

यावेळी पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी, कविता डांगरे, मानसी तगारे, अशोक माने, कुमार मिणचे, विक्रम निंबाळकर, सुंदर कांबळे, अमोल पाटील, कुमार पाटील, श्रीकांत कटकोळे आदी मान्यवर व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!