विद्यार्थी घडविणारी जिवंत प्रयोग शाळा : प्राचार्य अशोक चिटणीसांच्या चरणी ‘पद्मश्रीं’चा मानाचा मुजरा !


विद्यार्थी घडविणारी जिवंत प्रयोग शाळा : प्राचार्य अशोक चिटणीसांच्या चरणी ‘पद्मश्रीं’चा मानाचा मुजरा!

ठाणे  : ज्या देशात गुरूला साक्षात परब्रह्म मानले जाते, त्या परंपरेचा एक देदीप्यमान सोहळा रविवारी ठाण्याच्या ‘सहयोग मंदिर’ येथे संपन्न झाला. साहित्याचा डोंगर उभा करणारे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक जेव्हा आपले मस्तक गुरुवर्य प्राचार्य अशोक चिटणीस यांच्या चरणी टेकवतात, तेव्हा तो केवळ एक सत्कार उरत नाही, तर तो कृतज्ञतेचा महासोहळा होतो!

अध्यक्षपदावरून बोलताना मधुभाईंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते गर्जून म्हणाले की, माझ्या आयुष्याला आणि साहित्याला जी कलाटणी मिळाली, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांनाच आहे. आज मी जो काही आहे, तो केवळ त्यांच्यामुळेच! प्राचार्य अशोक चिटणीस म्हणजे विद्यार्थी घडविणारी एक चालती-बोलती प्रयोगशाळा आहे. कर्णिकांच्या या शब्दांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. शिक्षकांशी विद्यार्थ्याचे असलेले नाते कोणत्याही काळात नष्ट होऊ शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि डिंपल पब्लिकेशनच्या वतीने आयोजित या सोहळ्यात प्राचार्य अशोक चिटणीस लिखित ‘शाळेतील वाचती गाजती ३४ वर्षे’ आणि ‘साहित्यरत्न पद्मश्री मधु मंगेश कर्णिक’ या दोन अनमोल ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य चिटणीस सर भावूक झाले. विद्यार्थी हे शिक्षकांसाठी पोटच्या गोळ्यासारखे असतात, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पातळीवर जाऊन त्याला ज्ञानाकडे न्यायचे असते, असे सांगतानाच माझे विद्यार्थी आज शाळा-कॉलेज चालवत आहेत हे पाहून माझे ऊर अभिमानाने भरून आले आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

माजी जिल्हाधिकारी आणि विद्यमान वाहतूक आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही आपल्या गुरुंबद्दल बोलताना एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला. दहावीच्या वर्गात असताना सरांनी आम्हाला गो. नी. दांडेकरांचे रेकॉर्डिंग ऐकवले, तिथूनच आम्हाला वैचारिक श्रीमंती काय असते याची ओळख झाली. प्रशासकीय सेवेच्या खडतर प्रवासात सरांनी दिलेले हे प्रोत्साहनच माझ्या कामी आले, असे त्यांनी अत्यंत नम्रपणे नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात गायक अनिरुद्ध जोशी यांच्या शारदा स्तवनाने झाली. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्या प्रभावी अभिवाचनाने वातावरणात एक वेगळीच रंगत भरली. डॉ. शुभा चिटणीस यांनी मुग्धाच्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. या सोहळ्याला डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, डॉ. विजय बेडेकर, निखिल आरेकर, कवी अशोक बागवे, डॉ. प्रदीप ढवळ, प्रकाशक अशोक मुळे, उमेश घोडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या नामवंत विद्यार्थ्यांचा चिटणीस सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, जो या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला. साहित्याचा ‘मधु’ आणि ज्ञानाचा ‘अशोक’ एकत्र आलेला हा क्षण ठाणेकरांच्या कायम स्मरणात राहील यात शंका नाही!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!