शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘राष्ट्रीय महामार्ग १६१/अ’; प्रशासन की जुलमी राजवट?


शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘राष्ट्रीय महामार्ग १६१/अ’; प्रशासन की जुलमी राजवट?

नांदेड | जैनोदीन पटेल

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१/अ म्हणजे विकासाचा मार्ग नसून सामान्य जनतेसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे! उस्माननगर, कौठा ते थेट कर्नाटक सीमेपर्यंतच्या या रस्त्याचे काम म्हणजे भ्रष्टाचाराचा एक उत्तुंग नमुनाच म्हणावा लागेल.

लोखंडी चौक ते मोतीनाला नदीपर्यंतचा रस्ता करताना प्रशासनाने जो काय हैदोस घातला आहे, त्याला लोकशाही म्हणायचे की मोगलाई? भूसंपादनाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही, शेतकऱ्यांच्या हातात मावेजाची एक छदामही टेकवली नाही, तरीही पोलीस बळाचा वापर करून गरिबांची घरे, दुकाने आणि शेतीवर नांगर फिरवण्यात आला. अहो, ज्यांच्या रक्ताघामातून ही जमीन उभी राहिली, त्यांना वाऱ्यावर सोडून हा कसला ‘राष्ट्रीय’ विकास साधला जात आहे?

त्यात भर म्हणजे मोतीनाला नदीवरील तो अर्धवट पूल! गेल्या तीन-चार वर्षांपासून कंत्राटदार काम अर्धवट सोडून पसार झाला आहे. सरकारला या पसार झालेल्या गुत्तेदाराचा पत्ता लागत नाही की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जातेय? याच नदीच्या पुरात दोन निष्पाप जीवांचा बळी गेला, तरीही प्रशासनाची कातडी अद्याप निबरच आहे. पुलाची उंची वाढवणे आणि दर्जा सुधारणे हे तर दूरच, पण साधे काम पूर्ण करण्याचीही दानत दिसत नाही. वाहनचालकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागतोय.

आता संयमाचा बांध फुटला आहे! जर तात्काळ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही आणि पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रताप पाटील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती रस्त्यावर उतरेल. मग होणारे ‘रस्ता रोको’ आंदोलन आणि उपोषण या प्रशासकीय अनास्थेची धूळधाण केल्याशिवाय राहणार नाही. गरिबांच्या शापाने जळालेली सत्ता कधीही टिकत नसते, हे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी पक्के ध्यानात ठेवावे!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!