अग्रलेख : वेळ हीच सर्वात मोठी न्यायाधीश : नियतीचे चक्र आणि अहंकाराचा शेवट !


अग्रलेख: वेळ हीच सर्वात मोठी न्यायाधीश : नियतीचे चक्र आणि अहंकाराचा शेवट !

राजकारणाच्या या राड्यामध्ये अन सत्तेच्या गुर्मीत वावरताना मानसाला आपल्या जिभेचा विसर पडतो. पण बाबांनो, निसर्गाचा नियम लय कडक असतोय. काळ कोणापाशी सांगून येत नाही अन कोणाला सोडत बी नाही. आपल्याकडे जुने जाणकार एक लय मोलाची गोष्ट सांगून गेलेत— “जवानीत तोंड सांभाळलं, तर म्हातारपणी उपयोगाला येतंय!” आज जे काय परिस्थिती दिसत हाय, ते बघितलं की या म्हणीचा इंगा बरोबर ध्यानात येतोय.

दोन दसकं उलटली त्या गोष्टीला. सत्तेचा लय मोठा माज डोक्यात शिरलेला होता, तेव्हा एका ज्येष्ठ आणि सरळमार्गी लोकप्रतिनिधीला हिणवण्यासाठी शब्द वापरले गेले होते की, “बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो!” एका अनुभवी माणसाचा असा अपमान करताना जिभेला हाड नव्हतं. उपयोग संपला की माणसाला अडगळीत टाकायची ही जी खोड होती, तीच आज नियतीनं उलटवली हाय. ज्यांनी दुसऱ्याला ‘बाजार’ दाखवायची भाषा केली, आज त्यांनाच राजकारणाच्या पटलावर आपली जागा टिकवण्यासाठी पदर पसरावा लागतोय. शरीर पार थकून गेलंय, पाय लटपटत्यात, बोलायला गेलं की शब्द फुटत न्हाईत. एकेकाळी गाजावाजा असणारा माणूस आज एका जागेसाठी आपल्यापेक्षा वयानं लई लहान असलेल्या नेत्यांच्या दारात उभा हाय. हीच ती काळाची थप्पड!

पण म्हणतात ना, “विनाशकाले विपरीत बुद्धी” सोडून जर “पश्चाताप” आणि “माणुसकी” धरली, तर आयुष्याची मावळती सुखाची होते.

माणसानं आपल्या संपत्तीचा अन शक्तीचा ताठा धरू नये, हे तर खरंच; पण जेव्हा वेळ उलटी फिरते, तेव्हा जुन्या चुका सुधारण्याची संधी बी निसर्ग देत असतो. आज जरी परिस्थिती अगतिक असली, तरी मिळालेली ही साथ ही केवळ राजकीय तडजोड नसून, ती एका अनुभवाप्रती दाखवलेली माणुसकी हाय. दुसऱ्याच्या म्हातारपणाची थट्टा केली असली, तरी आज जेव्हा तरुण पिढी त्यांना सांभाळून घेत हाय, तिथंच खरं तर माणुसकीचा विजय होतोय.

शेवटी एकच खरं— नियती आपला हिशोब चुकता करतेच, पण ज्याला आपल्या चुका उमजतात आणि जो सत्तेपेक्षा नात्याला मोठं मानतो, त्याचा शेवट गोड होतो. अहंकाराचा वारा सोडून जर आपण मातीच्या वाटेने चाललो, तर काळ बी आपल्याला माफ करतो. आता तरी आपण हा बोध घेऊ की, कुणी बी आपल्या सुबत्तेचा माज करू नये. जगात प्रेम आणि आदरच शिल्लक राहतो, सत्ता अन खुर्ची तर आज हाय अन उद्या न्हाई. काळाच्या या खेळातून माणुसकीचा झरा वाहत राहो, हेच सर्वांसाठी मंगलमय ठरेल!


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!