गझलचा ‘बहार’ अन् भटांचा ‘दरबार’! कोल्हापुरात शब्दांच्या मैफलीने मारली बाजी !

कोल्हापूर : गझल म्हणजे केवळ यमक-अनुप्रासांची जुळवाजुळव नव्हे, तर काळजाच्या जखमेतून उमटलेला आर्त हुंकार! याच गझलचा झेंडा खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्या ‘गझलसाद’ संस्थेचा आठवा वर्धापनदिन आणि गझलसम्राट सुरेश भट यांचा ९४ वा जन्मदिवस… असा हा सोन्याहून पिवळा योग कोल्हापुरात एका रंगतदार मैफलीने साजरा झाला. साक्षात गझलेचे ‘गॉडफादर’ सुरेश भट यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना, शब्दांच्या आकाशात भावनांचे पतंग भिरभिरू लागले आणि कोल्हापूरच्या रसिकतेची पताका पुन्हा एकदा डौलाने फडकू लागली!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शब्दांचे जाणकार डॉ. दिलीप कुलकर्णी. गझलसादचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी स्वागताचे असे काही रसाळ प्रास्ताविक केले की, पुढच्या मैफलीची भूक अधिकच वाढली. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कविवर्य सुरेश भट आणि ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ‘एक रविवार : एक गझल’ या युट्यूबवरील उपक्रमाचा ३०० वा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. अहो, गझल लिहिणे सोपे असेलही, पण ती ३०० रविवार सातत्याने लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे ‘हिमालयाची उंची’ गाठण्यासारखेच आहे! तसेच, संस्थेला सावलीसारखी साथ देणाऱ्या सुभाष नागेशकर यांचाही कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
मैफलीत जेव्हा शेर आणि कवितांच्या फैरी झडू लागल्या, तेव्हा श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले. अशोक वाडकर यांनी ‘असेच येते जुळून गाणे’ म्हणत मैफलीचा नूरच पालटून टाकला. प्रा. नरहर कुलकर्णी यांनी “शतके उलटून गेली, मानवधर्म समजला नाही” अशा शब्दांत मानवी वृत्तीवर कोरडे ओढले. हेमंत डांगे यांनी “हृदयी थोडे घाव असावे” म्हणत माणुसकीचे तत्वज्ञान मांडले. तर खुद्द अध्यक्ष डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी “अक्कल हवीच असते नक्कल करावया” असे सुनावत मिश्किल टोलेबाजी केली. ही चपराक अनेकांना लागली असेल यात शंकाच नाही! प्रसाद कुलकर्णी यांनी तर “पार्लर वास्तव झाकत असते व्यवसायाचे” अशा शब्दांत बाह्य सौंदर्याचा फुगा फोडून अंतरंगाच्या निर्मळतेचे गोडवे गायले. शेरखान तांबट, बाळकृष्ण पाटील, नंदिनी साळुंखे पाटील आणि रमेश कुलकर्णी यांनीही आपल्या रचनांनी मैफलीत ‘रंग’ भरले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कुलकर्णी यांनी सुरेश भटांच्या आठवणींना उजाळा दिला. “ज्यांनी भटांचा सहवास अनुभवला त्यांनी मुळाक्षरे गिरवली, तर अनेकांनी एकलव्याप्रमाणे त्यांच्या बाराखडीतून दीक्षा घेतली,” असे सांगत त्यांनी गझल लेखनातील प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले. कवितेचे सर्व प्रकार श्रेष्ठच असतात, पण लिहिण्यातील सच्चेपणा महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. नागेशकरांच्या निवासस्थानी रंगलेल्या या काव्यमैफलीस शिवप्रसाद ओझा, ए.आय. बागवान, अस्मिता वाडकर आणि प्रकाश साळुंखे पाटील यांच्यासह कोल्हापुरी रसिकांनी तुफान गर्दी केली होती. एकूणात काय, तर गझलचा हा ‘साज’ आणि भटांचा हा ‘साद’ काळजाचा ठाव घेणारा ठरला!



























