मटक्याचा अजब गणित तज्ञ : टिपसर..!


मटक्याचा अजब गणित तज्ञ : टिपसर..!

मटक्याच्या या अथांग दरियात ‘टिपसर’ नावाचा असा एक अजब प्राणी असतो, ज्याच्या शब्दाशिवाय आकडा सोडाच, पण साधी पानाची काडी बी हलत नाही. टिपसर म्हणजे काय साधी-सुधी आसामी न्हाय; तो गणिताचा असा एक चालता-बोलता कोडा हाय, ज्याच्यापुढं ‘नासा’चे शास्त्रज्ञ बी नापास होतील. लोकं याला मटक्यातला ‘अर्थतज्ञ’ म्हणत्यात! देसाचा बजेट मांडणाऱ्याला एखादं गणित चुकलं तर चालेल, पण या अर्थतज्ञाला ‘कल्याण-मेन’च्या चार्टमधली प्रत्येक बेरीज आणि वजाबाकी तोंडपाठ असती. याच्या आयुष्यात सूर्याच्या उगवण्या-मावळण्यापेक्षा ‘ओपन’ आणि ‘क्लोज’च्या येण्याला जास्त किंमत असती. म्हणूनच हा गडी फुशारकीनं सांगतो, “मटके के दुनिया मे बहार ही बहार है, चार आठे तीन चौका बेकरार है!”

सकाळी तांबडं फुटलं की याच्या हातात शाई संपलेला बॉलपेन आणि समोर जुना मटका चार्ट येतो. मग सुरू होत्या आकड्यांच्या चिंध्या! नऊमधून सहा गेल्यावर तीन उरत्यात, हे शाळेत मास्तरनं शिकवलं असल; पण या टिपसरच्या जगात नऊ आणि सहाची बेरीज करून ‘पाच’ कसा येतो (म्हणजेच पंजा ओपन!), हे सांगताना याची अक्कल पाहून साक्षात पायथागोरस बी चक्रावून जाईल. या माणसाला रात्रीची झोपच येत न्हाय बघा. डोळे झाकले की स्वप्नात बी आकडेच लावणी धरून नाचत असत्यात.

टिपसरचा अवतार बघितला की वाटतं, बिचाऱ्याने आख्ख्या जगाचं ओझं आपल्याच खांद्यावर घेतलंय. तोंडात अर्धवट पेटलेली इडी, हातात चकाकणारा पेन आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चश्मा—ज्यातून याला ते आकडे दिसत्यात जे साध्या माणसाच्या बापाला बी कधी दिसणार न्हायत. याचं विश्लेषण ऐकणं म्हणजे एक कॉमेडी शोच असतो.

टिपसर छातीठोकपणे सांगतो, “मालक, आज हुकमी ‘डबल’ येणार म्हणजे येणारच! डोळे झाकून लावा!” बिचारा भोळा गिराईक याच्या शब्दावर विश्वास ठेवून खिसे रिकामा करतो. पण संध्याकाळ झाली की परिस्थिती पार पालटलेली असती. ज्या ‘डबल’च्या आशेवर गडी स्वप्न बघत असतो, तिथं भलतंच ‘पाने’ पडलेलं असतं. मग हा गणित तज्ञ “बाजारवाल्यानं गेम फिरवला” किंवा “लोड जास्त झालाय” म्हणून आपली कातडी वाचवून मोकळा होतो!

“ओपन जेऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही.!”

अशी काहीशी केविलवाणी आणि विचित्र अवस्था आज मटका खेळणाऱ्यांची झाली हाय. आकड्यांच्या या नादात पडलेला माणूस दुपारच्या जेवणापेक्षा ‘ओपन’ काय पडला यातच हरवलेला असतो आणि रात्रीची झोप तर ‘क्लोज’च्या काळजीत पार उडालेली असती. घरात बायकोनं कालवण काय केलंय हे विचारण्यापेक्षा हा गडी ‘जोडी’ काय बसली हे विचारण्यात धन्यता मानतो.

टिपसरचं गणित आणि नशीब यांचा हाडवैरच असतं बघा. वर्षाचे बारा महिने बघितले, तर त्यातले अकरा महिने हे टिपसर पुरते ‘गेलेले’ असत्यात. पण ज्या दिवशी चुकून एखादा ‘ओपन-क्लोज’ फिक्स बसतो, त्या दिवशी या टिपसरचा थाट एखाद्या वाघासारखा असतो. मग हा गावभर बोंबलत सुटतो, “मी बोललो होतो की नाही? माझ्या गणितात कधीच चूक नसते!” बाकीचे अकरा महिने तो ‘ग्राफ बदललाय’ अशी मखलाशी करून पुन्हा आपल्या इडीच्या धुराड्यात आणि चार्टच्या जाळ्यात हरवून जातो.

थोडक्यात सांगायचं तर, टिपसर होणं हे काय साध्या-सुध्या ‘गोम्याचं’ काम न्हाय. त्यासाठी मेंदूची दहीहंडी करावी लागती. रात्रभर जागून आकडेमोड करायची, इडीच्या धुरानं फुफ्फुसं आणि गणितानं डोकं गरम करायचं आणि अखेर रिकाम्या खिशानं ‘आजचा आकडा फिक्स हाय’ असं सांगायचं, हे कसब फक्त याच महाभागाकडं असतं.

अखेर या टिपसरच्या गणिताचं अजब लॉजिक असं असतं की, समोरच्याचं ‘कल्याण’ होवो ना होवो, पण टिपसर मात्र स्वतःच्या आकड्यांच्या जगात ‘मेन मुंबई’चा राजा होऊन फिरत असतो. त्याची अवस्था पाहून इतकंच म्हणावंसं वाटतं— टिपसर म्हणजे एक असा महान ‘टाईमपास’ हाय, जो लोकांना लखपती होण्याची स्वप्नं दाखवतो आणि स्वतः मात्र शिलकीत उरलेली शेवटची इडी ओढत उद्याच्या चार्टची वाट पाहत बसतो!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!