शिक्षक की वेठबिगार ? सांगलीत गुरुजींच्या सहनशीलतेचा अंत; मॅपिंगच्या नावाखाली छळवणूक थांबवा!


शिक्षक की वेठबिगार ? सांगलीत गुरुजींच्या सहनशीलतेचा अंत; मॅपिंगच्या नावाखाली छळवणूक थांबवा!

सांगली (अशोक मासाळ) :

सांगली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या नियमावलीचे अजब नाट्य रंगले असून, प्रशासनाच्या एका फतव्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आधीच विद्यार्थ्यांच्या परीक्षा, त्यात निकालाचे ओझे आणि आता निवडणूक कामासोबतच ‘मॅपिंग’चा ससेमिरा; अहो, आमचा शिक्षक ज्ञानदान करतोय की एखाद्या रेशनिंगच्या दुकानात कारकून म्हणून राबतोय?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

यंत्रणेचा ताण की शिक्षकांचा छळ?

शिक्षक भारतीच्या वतीने १० एप्रिल २०२६ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र धाडण्यात आले. विषय होता—शाळांची वार्षिक तपासणी आणि पट पडताळणी पुढे ढकलण्याचा. सध्या परिस्थिती अशी आहे की, शिक्षकाला वर्गात शिकवण्यापेक्षा संगणकावर ‘सेल्फ मॅपिंग’ आणि ‘प्रॉक्सी मॅपिंग’ करण्यातच जास्त डोकं खर्च करावं लागत आहे. १० ते २० एप्रिल या अवघ्या १० दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण करण्याची सक्ती म्हणजे शिक्षकांना माणूस न मानता ‘यंत्रमानव’ समजण्याचाच प्रकार आहे.

प्रशासकीय घोळ आणि शिक्षकांची कोंडी

शासनाच्या धोरणांचा ‘साष्टांग नमस्कार’ करावा तितका थोडाच! संचमान्यता पूर्ण झाली तरी समायोजन रखडलेले आहे आणि त्यातच पुन्हा पट पडताळणीचा नवा घाट घातला जात आहे. “घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा,” अशीच काहीशी अवस्था शिक्षण विभागाची झाली आहे. एकीकडे संस्थाचालकांचा पट टिकवण्याचा दबाव आणि दुसरीकडे प्रशासनाचे जाचक आदेश, अशा दुहेरी कात्रीत सामान्य शिक्षक पार भरडून निघाला आहे.

या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर माने, कार्याध्यक्ष संजय पवार, खजिनदार रतन कुंभार, प्रसिद्धीप्रमुख अशोक मासाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “जर ही जाचक तपासणी तात्काळ पुढे ढकलली नाही, तर शिक्षकांचा संयम सुटेल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

शेवटी एकच प्रश्न उरतो—जर गुरुजींना माणूस म्हणून वागवले नाही, तर उद्याच्या पिढीला संस्कार द्यायला ‘माणूस’ उरेल का?


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!